नवी दिल्ली- कॉमनवेल्थ गेम्स मध्ये प्रथमच समावेश झालेल्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड ला चार धावांनी नमवत फायनलमध्ये धडक मारली आहे.भारतीय महिलांच्या सांघिक खेळीपुढे इंग्लंड चा संघ गारद झाला अन भारताने फायनल गाठली.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घतल्यानंतर भारताची उपकर्णधार स्म्रीती मंधाना हिने धमाकेदार अर्धशतक झळकावले. तिच्या अर्धशतकी आणि जेमिमाह रॉड्रिगेज हिच्या नाबाद ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ताबडतोड सुरुवात केली. आणि पहिल्या विकेटसाठी २.५ षटकांत २८ धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने आपले फलंदाजीतील आक्रमण सुरू ठेवले आणि प्रत्येक वेळी लक्ष्य आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.
यावेळी इंग्लंडसाठी सलामीवीर फलंदाज डॅनी वॅट हिने ३५ धावांची झंजावाती खेळी केली. तिच्याशिवाय कर्मधार नॅट सिव्हर हिने ४१, ऍमी जोन्स हिने ३१ धावा जोडत इंग्लंड संघाला लक्ष्याच्या जवळ पोहचवले. यावेळी भारतासाठी गोलंदाजीमध्ये दिप्ती शर्माने सर्वोत्कृष्ट खेळी करून ४ षटकांत १८ धावा देत १ विकेट घेतली. याशिवाय स्नेह राणा हिने आपल्या ३ षटकात १९ धावा देत १ विकेत आपल्या नावे केली. तर भारतीय संघाने उत्तम क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवतं इंग्लंडच्या २ फलंदाजांना धावबाद केले. भारताने सामन्याच्या शेवटी चांगली गोलंदाजी करत सामन्यात पकड मजबूत केली.
दरम्यान, आता कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील क्रिकेट स्पर्धांचा अतिम सामना रविवार ७ ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. यावेळी दुसऱ्या संघाचा निर्णय आज रात्री दुसऱ्या उपांत्य फेरीतून मिळणार आहे. शिवाय दोन्ही सामन्यात पराभूत झालेल्या संघांमध्येही कांस्य पदकासाठीची लढत होणार आहे.