नवी दिल्ली- बर्मिंगम हॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.65 किलो वजन गटात पुनियाने कॅनडाच्या मॅकनिल याचा पराभव केला.
कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा दणक्यात पराभव केला. बजरंग पुनियाने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला मॅकनीलने काही वेळा टक्कर दिली. पण अखेर बजरंग पुनियाने ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी प्रकाराने हा सामना जिंकला आणि यंदाच्या स्पर्धेत कुस्तीतील भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. आजच्या सामन्यातही अंशूने सुरूवातीचे २ राऊंड्स मिनिटभराच्या आतच जिंकले. पण नंतर सामना फिरला. दोन वेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिने आपला आक्रमक खेळ दाखवला आणि अखेर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.