मुंबई – राज ठाकरे चांगलं व्याख्यान देतात मात्र नंतर ते चार सहा महिने भूमिगत होतात अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.राज्यात जातीच्या आधारावर फूट पडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुरू झाले अशी टीका राज यांनी केली होती .
महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे आणि फूट पाडत राहणे याची सुरूवात राष्ट्रवादीने केली.अशी टीका राज ठाकरे यांनी गुढी पाडवा निमित्ताने आयोजित सभेत बोलताना केली होती.
निवडणुकींच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो आहोत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असाही सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, देशात जातीच्या आधारावर सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.जे उत्तर प्रदेश मध्ये घडले ते राज यांना राज्यात अपेक्षित आहे का,आम्ही ते होऊ देणार नाही .राज चांगले बोलतात मात्र त्यांच्याकडे संख्याबळ मर्यादित आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही असेही पवार म्हणाले.