बीड – टीईटी घोटाळ्यात अनेक नवे किस्से समोर येत आहेत.2021 साली परीक्षा दिलेल्या 7880 शिक्षकांची प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आल्यानंतर आता 2018 मध्ये जवळपास आठशे पेक्षा जास्त शिक्षकांनी परीक्षेत पास न होताच प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे.
टीईटी २०१८ च्या परीक्षेत राज्यभरात एकूण १ लाख ५७ हजार ६५० परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ९ हजार ६७७ परीक्षार्थी पास झाल्याचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये ८१७ परीक्षार्थी हे अपात्र असतानाही त्यांच्याकडून पैसे स्वीकारून एजंटामार्फत त्यांना पात्र असल्याचे दाखवून त्यांची नावे मुख्य निकालात घुसडण्यात आली होती. हा निकाल वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर त्यात ८८४ परीक्षार्थींना पात्र असल्याचे दाखवून खोटा निकाल जाहीर केला. अशा प्रकारे २०१८ मधील परीक्षेत १ हजार ७०१ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. त्कालीन शिक्षण आयुक्त तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि जिए सॉप्टवेअर कंपनीचे संचालक अश्वीन कुमार सह इतर जणांनी १७०१ बनावट शिक्षक बनवले होते.
टीईटी २०१८ च्या परीक्षेत बोगस शिक्षकांच्या यादीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे या जिल्हयात बोगस शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. धुळयात (२६३), नाशिक( २३६), जळगाव (२१९), नंदुरबार (२०४), ठाणे (१०२), औरंगाबाद (७०), मुंबई पश्चिम (६८), मुंबई उत्तर (८३), मुंबई दक्षिण (३०), पालघर (३४), पुणे (४२), सोलापूर, (२८), अहमदनगर (२२) सांगली (२७), जालना (१४), बीड (३७), बुलढाणा (७४), अमरावती (३५), नांदेड (१९), कोल्हापूर (१५) अशी बोगस परीक्षार्थींची यादी समोर आली आहे.
टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून यात प्रशासनातील अधिकाऱ्यांसह परीक्षा घेणाऱ्या एजन्सी मधील लोकही सहभागी असल्याचे समोर येत आहे.आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.