बीड- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षाने आता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी दिली आहे.परभणीचे विद्यमान पालकमंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत असल्याने पक्षाने ही जबाबदारी मुंडे यांच्याकडे दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर ला पार पडली.या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांच्याकडे असलेली पालकमंत्री पदाची जबाबदारी मुंडे यांच्याकडे देण्याची सूचना केली अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.अधिवेशनात देखील या मुद्यावरून बराच गोंधळ झाला.मात्र पक्षाने त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता त्यांच्याकडील पालकमंत्री पद मुंडे यांना देण्याचा निर्णय झाल्याने मलिक यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.