December 10, 2022

अनिल दादा याचा विचार कराच !

अनिल दादा याचा विचार कराच !

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर

बीड जिल्हा शिवसेनेची सूत्र पुन्हा एकदा अनिल जगताप यांच्याकडे आली.त्यांच्या या दुसऱ्या इनिंगसाठी न्यूज अँड व्युज कडून मनःपूर्वक शुभेच्छा ! मधल्या तीन चार वर्षाचा काळ वगळता बारा तेरा वर्ष जगताप हेच या पदावर होते,मात्र जशी देशात अन जिल्ह्यात काँग्रेस ची अवस्था आहे तशीच काहीशी अवस्था सेनेची बीड जिल्ह्यात आहे.मागील पाच वर्षे आणि सध्याची दोन वर्षे सत्तेत असूनही जिल्ह्यातील सत्तेत मात्र शिवसेना कुठेच दिसत नाही.गतकाळातील चुका सुधारून अनिल दादा सेनेला अच्छे दिन आणणार का? की पुन्हा पहिले पाढे पढ पंचावन्न अशीच गत होणार हे येणारा काळच ठरविलं. एक मात्र नक्की की गटबाजी अन अवैध धंद्याच्या मोहजाळात अडकलेली शिवसेना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान जगताप यांच्यासमोर आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली त्यानंतर बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून सुद्धा सेनेला मोठी ताकद मिळाली.प्रा सुरेश नवले, प्रा सुनील धांडे यांच्या रूपाने बीडला शिवसेनेचा आमदार आणि मंत्री मिळाला.

मात्र भाजपशी तडजोडीच्या राजकारणात शिवसेनेचा जिल्ह्यातील दबदबा कमी कमी होत गेला तो आज भिंग घेऊन शोधण्यापर्यंत गेला आहे.शिवसेना म्हणलं की बेंबीच्या देठापासून जय भवानी जय शिवराय, आवाज कुणाचा शिवसेनेचा या घोषणा देणारे भगवे गमजे गळ्यात घातलेले शिवसैनिक समोर दिसतात.

आज मात्र बीड सारख्या जिल्ह्यात शिवसेना कुठंच दिसत नाही.शिवसेनेत विजय बहिर किंवा सुनील धांडे यांच्या काळापर्यंत जोश अन जल्लोष होता अस म्हटल्यास वावग ठरणार नाही.मात्र जेव्हापासून दोन दोन जिल्हाप्रमुख ही कन्सेप्ट सेनेत आणली गेली तेव्हापासून सुभेदारी वाटून दिल्यासारखा कारभार सुरू झाला.संपर्कप्रमुख नावाचे मुंबई पुण्याचे नेते कधीतरी जिल्ह्यात येणार,चार दोन कर्यक्रम घेणार अन बॅगा भरून निघून जाणार अशी अवस्था सेनेची झाली.

बीड जिल्हा शिवसेनेची धुरा तेरा वर्ष अनिल जगताप यांच्याकडे होती.या तेरा वर्षाच्या काळात जिल्हा परिषद असो की नगर पालिका अथवा विधानसभेत सेनेला फार काही यश मिळवता आलं नाही.त्यांच्यानंतर आलेल्या कुंडलिक खांडे यांच्या काळात तर सेनेचा पदाधिकारी होण्यासाठी अवैध धंदे करता आले पाहिजेत अशी अट नेतृत्वाने घातली की काय अस वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.ते गुटख्याची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादग्रस्त ठरले अन पक्षातून बाजूला केले गेले.

अनिल जगताप म्हणजे एक शांत,सुस्वभावी, प्रेमळ माणूस.खरतर असा माणूस राजकारणात नसायलाच पाहिजे एवढा सरळ हा माणूस.पण यांचं आणि गुलालाच नेमकं काय वाकड आहे माहित नाही,पण दादांच्या खांद्यावर गुलाल काही पडला नाही.त्याला काही प्रमाणात त्यांचा स्वभाव देखील कारणीभूत आहे हे नक्की.हा माणूस संघटना बांधणीसाठी देखील कधी झडझडून कामाला लागलेला दिसला नाही.कार्यालयात दुपारी यायचं,कार्यकर्त्यासोबत बसायचं,नंतर दुपारी बाहेर पडायचं, मित्रांच्या मैफलीत रमायच,मुंबईला जाताना आणि गेल्यावर किती दिवस तिकडं राहील पाहिजे याचा देखील या माणसाने कधी विचार केला नाही.

खरतर पद भेटल्यानंतर गावोगावी सतत संपर्क ठेवला,कार्यकर्त्यांच नेटवर्क तयार केलं,बुथप्रमुख,शाखाप्रमुख, वार्ड प्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या तर त्याचा उपयोग निवडणुकीत नक्कीच होतो.पण जिल्ह्यात कोणताही जिल्हाप्रमुख असो या नियुक्त्या केवळ कागदावर झाल्याचे दिसले अन त्याचा निवडणुकीत पक्षाला फटका बसला.

गेल्या चार वर्षात जिल्ह्यात शिवसेना म्हणजे दोन नंबर चे धंदे करणाऱ्यांना सहकार्य करणारा पक्ष अशी इमेज झाली.बर या परिस्थितीला एकटे खांडे जबाबदार होते का तर नक्कीच नाही आजी माजी सगळेच या धंद्यात गुंतलेले असल्याने कोणाला झाकायचे अन कोणाला काढायचे असा प्रश्न कदाचित श्रेष्ठीना पडला असेल.त्यामुळेच कदाचित चार महिने हे पद रिक्त ठेवण्याची वेळ पक्षावर आली असावी.

कोणतीही मोठी निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत, नगर पालिका,जिल्हा परिषद, सेवा सहकारी सोसायटी येथे आपले लोक निवडून आणावे लागतात हे बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाला कोणीतरी खडसावून सांगायला पाहिजे.केवळ गुटखा,मटका,वाळू,पत्याचे क्लब,जुगार अड्डे,हप्तेखोरी केली म्हणजे निवडणूक जिंकता येत नसते हे या पदाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे.

बीड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्या वयाचा अन अनुभवाचा विचार केला तर अनिल जगताप हे दोन्ही बाबतीत सिनियर आहेत,मात्र पंचायत समिती,जिल्हा परिषद नगर परिषद च्या माध्यमातून संदिप यांनी थेट विधानसभेत धडक मारली.पण जगताप यांना मात्र तिथपर्यंत च काय पण नगर पालिकेत देखील स्वबळावर सत्ता आणता आली नाही याचा त्यांनी यावेळी तरी नक्कीच विचार करायला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षे आहेत,आजपासून जर त्यांनी पेरणी केली तर 2024 ला कदाचित त्यांचे विधानसभेचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल,मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे निश्चित.

बर जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांना नेतृत्वाने देखील कधी ताकद दिल्याचे दिसून आले नाही.कुठल महामंडळ नाही की काही नाही.कमवा आणि शिका या योजनेतून सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतात की काय अस नेहमी वाटत.संपर्क प्रमुख असोत की मुंबई चा कोणीही पदाधिकारी, मंत्री,आमदार,खासदार या लोकांची मोठमोठ्या हॉटेलमध्ये शाही बडदास्त ठेवावी लागते.पूर्वी गजानन कीर्तिकर,सुरेश प्रभू,लीलाधर डाके यांच्या काळात सेनेत जी लोकलेखा समिती होती ती तर आज कुठंच दिसत नाही पण शाहीपणा अन दरबारी राजकारण सेनेत आल्याचं दिसून येत.

बीड जिल्हा शिवसेनेची सूत्र पुन्हा एकदा अनिल दादा यांच्याकडे आली आहेत,विशेष म्हणजे आता क्षीरसागर यांच्याशी छुपा अजेंडा राबविण्याची त्यांना गरज नाही कारण ते देखील आता सेनेत आहेत,त्यामुळे त्यांनी जर अंग झडझडून कामाला सुरुवात केली तर सेनेला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही.पण त्यासाठी जगताप यांना वाळू,क्लब अन इतर अवैध धंद्याच्या गराड्यातून बाहेर पडावे लागेल.माणूस चांगला आहे पण नको त्या धंद्यात आहे अस जर लोक दबक्या आवाजात म्हणत असतील तर दादांना त्यांची ही इमेज बदलावी लागेल हे नक्की.अवैध धंदे करणारे लोक,पदाधिकारी यांना दूर ठेवावे लागेल.ग्राउंड वर नेटवर्क असणारे,संघटनेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे कार्यकर्ते मोठे करावे लागतील.नाहीतर पुन्हा जर वाळू,मटका,गुटखा,बियर बार असणाऱ्यांना सोबत घेऊन काम सुरू केलं तर सेना औषधाला सुद्धा उरणार नाही हे निश्चित.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click