बीड – टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्या नावाने बोगस रुजू आदेश आणून नोकरी मिळवणाऱ्या एका शिक्षिकेसह बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.परभणीचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्यामुळे बोगस नोकरीचे आदेश काढून फसवणूक करणाऱ्यांना दणका बसला आहे.विशेष म्हणजे यातील शिक्षिका ही बीड जिल्ह्यातील आहे,त्यामुळे पुन्हा एकदा बोगसगिरी मध्ये बीडचे नाव बदनाम झाले आहे.
राज्यात झालेल्या टीईटी परीक्षा, आरोग्य विभागातील विविध पदाच्या परीक्षा अन् नंतर म्हाडाच्या पदभरतीपरीक्षेदरम्यान गैरप्रकाराचे बीड हे केंद्रबिंदू असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. बीडमधील काही ढगांनी गुणवत्तेने पुढे जाणार्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी स्व:तच नको ते उद्योग केले होते, ते मागील काही दिवसात राज्यासमोरही आले. इतके सारे झाल्यानंतर बीडचा ‘वडझरी’ पर्टनचीही मोठी चर्चा झाली. त्यानंतर वडझरीचाच मूळ राहिवासी असलेल्या राहूल सानपने ‘म्हाडा’च्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील जवखेडा येथील एका डमी विद्यार्थ्याला परीक्षेत बसवण्याचा प्रयत्न केला,मात्र टीसीएसच्या चाणाक्ष अधिकार्यांच्या तपासणीत या प्रकाराचा भांडाफोड झाल्यानंतर दोन्ही आरोपींना गजाआड जावे लागले. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आहे. शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाव्दारे चक्क परभणी जिल्हा परिषदेतंर्गत रुजू होण्याचा प्रयत्न बीडमधील एका महिलेने केला आहे. या प्रकरणात आता परभणी जि.प.चे सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना संबंधित शिक्षिकेविरुध्द महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.या प्रकाराने पुन्हा एकदा बीडचे नाव बदनाम झाले आहे.
टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तथा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामध्ये आता प्राथमिक शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाची भर पडली आहे. 11 ऑक्टोबर 2021 रोजी सुपे यांच्या नावाने परभणी जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांच्या नावे एक आदेश काढण्यात आला. त्यामध्ये 12 प्राथमिक शिक्षण सेवकांची नावे देऊन त्यांना तात्काळ रुजू करुन घेण्याचे आदेश दिले होते. परीक्षा परिषदेमार्फत प्रत्येक वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या नावे आदेश येतात. यावेळी थेट शिक्षणाधिकार्यांच्या नावे आदेश आल्याने जि. प. सीईओं शिवानंद टाकसाळे यांना संशय आला. यामुळे त्यांनी या आदेशाची पडताळणी करण्यासाठी दि. 16 नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी टी. एस. पोले यांना पुणे येथे पाठविले.
पोले यांनी राज्य शिक्षा परिषदेच्या कार्यालयास भेट देऊन या आदेशाची शहानिशा केली असता तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे पत्र परभणी जि. प.च्या वतीने सुपे यांना देण्यात आले होते. परंतु, सुपे यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळ्यात सुपे यांना 16 डिसेंबर रोजी अटक झाली. या पार्श्वभूमीवर ज्या बनावट शिक्षण सेवक नियुक्तीच्या आदेशात 12 शिक्षण सेवकांची नावे दिली होती, त्यातील बीडमधील एक महिला शिक्षिका 16 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील उखळी (ता.सोनपेठ) येथील जि.प. शाळेवर रुजू होण्यासाठी आली. या महिलेसोबत परभणी जि. प. सीईओंच्या बनावट स्वाक्षरीचा नियुक्ती आदेश होता.यावेळी उपस्थित मुख्याध्यापकाने या महिलेकडील मूळ कागदपत्रांची तपासणी केली असता आधार व पॅनकार्डवरील नावात तफावत आढळली.
त्यामुळे त्यांनी याबाबत सोनपेठ गटशिक्षणाधिकार्यांना कल्पना दिली. सोनपेठ गटशिक्षणाधिकार्यांनी शिक्षणाधिकार्यांकडे चौकशी केली असता त्यांनी असा कोणताही आदेश काढला नसल्याचे सांगितले. ही बाब सीईओ टाकसाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर टाकसाळे यांनी याप्रकरणी शिक्षणाधिकारी पोले यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्रे मागितल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. याची कुणकुण लागताच सदरील महिला पसार झाली. आता याप्रकरणी टाकसाळे यांनी पोलीस अधीक्षकांनाच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.