बीड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रेमडीसविर या इंजेक्शनचा काळाबाजार झाला.विशेष म्हणजे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात रेमडीसविर वाटपात तफावत आढळून आली आहे,मात्र या प्रकरणी तपास कामात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड आणि इतर कर्मचारी पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांच्या तपासात मात्र अडचणी निर्माण होत आहेत. आता तपासकामी सहकार्य न केल्यास कारवाईचा ईशारा पोलिसांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या मार्च ते जून 2021 या काळात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाची संख्या वाढली होती.विशेष म्हणजे दिवसाला किमान एक ते दीड हजार रुग्ण आढळून येत होते.त्यावेळी कोरोना झालेल्या रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन मिळावे यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवाराची देखील धडपड सुरू होती.
अक्षरशः त्या काळात रेमडीसविर उपलब्ध होत नसल्याने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती.मात्र त्या काळातही मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्याची सवय लागलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या सीएस,एसीएस आणि इतरांनी या इंजेक्शनचा काळाबाजार केला.
या प्रकरणी दीपक थोरात या सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केल्यावर तब्बल पाच सात महिन्यांनी पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र या प्रकरणी वारंवार मागणी करून,चौकशी ला बोलावून देखील जिल्हा रुग्णालयाचे एसीएस डॉ सुखदेव राठोड,संयोर किपर रियाज,ठाकर,अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,राजरतन जायभाये हे सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या मेन स्टोर मधून सब स्टोर आणि तिथून दुसऱ्या सब स्टोर आणि मग वार्ड मध्ये रेमडीसविर वाटले गेले,मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.मात्र याबाबत डॉ राठोड किंवा ठाकर,मुंडे कोणीच सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेमडीसविर चा हा घोटाळा दडपण्यासाठी डॉ राठोड आणि यात सहभागी असलेले कर्मचारी जाणीवपूर्वक पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे यापुढे सहकार्य न केल्यास आणि चौकशीला हजर न राहिल्यास या लोकांचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून अहवाल पाठवून कारवाई केली जाईल असा ईशारा पोलीस उपअधीक्षक यांनी दिला आहे.