बीड – आरोग्य भरती अन म्हाडा नंतर आता आणखी एक पेपरफुटी घोटाळा उघडकीस आला आहे.शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तथा राज्य शिक्षण परिषदेचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.हे सगळे प्रकरण म्हाडा पेपरफुटीशी संलग्न असलेल्या प्रितेश देशमुख यांच्याशी संबंधित आहे .
टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना सुपे यांनी पैसे घेऊन पास केल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रे म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी-चिंचवडमधील घरातून सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. तुकाराम सुपेंना गुरुवारी सकाळपासून चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर पुणे पोलिसांनी आज सुपे यांना अटक केली आहे. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी जी. ए. टेक्नॉलॉजीकडे होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झाल आहे. पेपर फुटीचा तपास करणाऱ्या यंत्रणांना एका प्रकरणाचा तपास करता करता आणखी एका परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचे समजले. त्या दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरु केला की, आणखी एका तिसऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचे लक्षात येत आहे. पेपर फुटीचे हे चक्र प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारे ठरत आहे.