बीड- भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपने स्वतःचा पॅनल उभाच न केल्याने भाजपचे कमळ गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे ज्या केज शहरातील नगर पंचायत साठी निवडणूक होत आहे तो भाग भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदार संघातील आहे.
राज्यातील नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली असून बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पहावयास मिळत आहे.बीड जिल्ह्यात केज,वडवणी, आष्टी,पाटोदा आणि शिरूर या ठिकाणी नगर पंचायत ची निवडणूक होत आहे.
आष्टी,पाटोदा,शिरूर आणि वडवणी मध्ये आ सुरेश धस आणि राजाभाऊ मुंडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.मात्र केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपने पॅनल उभा केलेला नाही .या ठिकाणी खा रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चे पॅनल,तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन पॅनल आहेत,मात्र भाजपच्या नमिता मुंदडा या विधानसभेच्या आमदार असून देखील या ठिकाणी भाजपने पॅनल उभे केलेले नाही.
मुंदडा यांनी पॅनल न उभा केल्याने येथे भाजपच्या समर्थकांना काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल चा सहारा घ्यावा लागत आहे.या ठिकाणी भाजपने पॅनल न उभा करण्याचे नेमके कारण काय ?अशी चर्चा आता होऊ लागली आहे.