मुंबई – दिवाळीच्या सुट्यानंतर पहिली ते चौथी च्या शाळा सुरू होतील असा अंदाज होता,त्यानुसार येत्या 1 डिसेंबर पासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.लवकरच याबाबत सूचना दिल्या जातील असे त्यांनी म्हटले आहे .
तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ राज्यातील सर्वच शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या.ऑक्टोबर महिन्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले,त्या दरम्यान अल्प प्रमाणात विद्यार्थ्यांना कोविड 19 ची बाधा झाल्याचे दिसून आले,त्यामुळे आता पहिली ते चौथी च्या शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील माध्यमिक शाळांचे वर्ग काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. त्यानुसार आठवी ते दहावी तसेच ११ वी १२ वीचे वर्ग सुरू झाले होते. मात्र लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून पहिली ते सातवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नव्हते. मात्र आता हे वर्ग सुरू होणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळांचे बहुतांश वर्ग बंद होते. मात्र आता राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू होणार आहेत, शाळेमध्ये सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच शाळा सुरू झाल्यावर घ्यावयाची खबरदारी आणि नियमावलीबाबत आम्ही येत्या आठ दिवसांमध्ये निर्णय घेणार आहोत, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे