अंबाजोगाई – राज्याला हादरा देणारी घटना शिक्षणाची पंढरी असलेल्या अंबाजोगाई मध्ये उघडकीस आली आहे.नवऱ्याने सोडलेल्या आणि वडिलांनी हाकलून दिल्यानंतर भीक मागून जगणाऱ्या अल्पवयीन मुलीवर या काळात तब्बल चारशे पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला आहे.या मुलीने गर्भवती झाल्यानंतर दिलेल्या जबाबात पोलीस कर्मचाऱ्याने देखील अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.या भयानक प्रकाराने खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेत चारशेजणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाईत घडला. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान ही बाब उघडकीस आली.
बालहक्क कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की, एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या वडीलांनी लावून दिले होते. सासरी नवरा सांभाळत नसल्याने ती वडीलांकडे रहायला आली. परंतु त्यांनीही तिला सांभाळले नाही. यामुळे ती अंबाजोगाई बसस्थानक परिसरातच रहायची. या काळात चारशेजणांनी अत्याचार केल्याचे जवाबात म्हटले आहे. तसेच एका पोलिस कर्मचार्याने अत्याचार केल्याचेही तिने सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात बालविवाहाप्रकरणी वडीलांसह नातेवाईकांवर व अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुरवणी जवाबात आणखी आरोपींची नावे समोर येतील असे डॉ.अभय वनवे यांनी सांगितले.