बीड- तुमच्या आमच्या खिशात असणाऱ्या नोटा या कागदापासून बनतात ! हो ना,सगळ्यांना असच वाटत की कागदाच्या लगद्यापासून या नोटा तयार केल्या जातात ,म्हणून तर अनेकदा कागदाच्या तुकड्याला खूप महत्त्व आल्याचं आपण बोलतो,मात्र या नोटा कागदापासून नव्हे तर कापसापासून बनतात अस कोणी सांगितले तर ! विश्वास नाही ना बसणार पण हे खरं आहे.नव्या नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो कारण कापूस हा कागदापेक्षा टिकाऊ अन मजबूत असतो .या कापसापासून जो कागद बनतो त्यावर नोटांची छपाई केली जाते .
सध्याच्या काळात ऑनलाइन, डिजिटल व्यवहार प्राधान्यानं केले जात असले तरी चलनी नोटांचं महत्त्व कमी झालेलं नाही. अशा या नोटांची निर्मिती नेमकी कशी होते? त्यासाठीचे नियम, प्रक्रिया काय आहे? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.
नोटांची निर्मिती विशिष्ट कागदापासून केली जाते, असं काही जण म्हणतात; पण ते चुकीचं आहे. कारण नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. दैनंदिन वापरातल्या नोटा अनेक जणांकडून प्रवास करत आपल्यापर्यंत येत असतात. अतिवापरामुळे या नोटा लवकर फाटू नयेत, खराब होऊ नयेत, यासाठी नोटांची निर्मिती कापसापासून केली जाते.
नोटांमध्ये 100 टक्के कापसाचा वापर केला जातो. त्यामुळे त्या दीर्घ काळ चांगल्या राहतात, असं `आरबीआय`ने स्पष्ट केलं आहे. भारतात केवळ रिझर्व्ह बॅंकेलाच नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. रिझर्व्ह बॅंक केंद्र सरकार आणि अन्य भागधारकांशी सल्लामसलत करून नोटांच्या पुरवठ्यासाठी विविध चलन छापखान्यांसह मूल्य आणि मागणीनुसार एका वर्षात आवश्यक असलेल्या नोटांच्या प्रमाणाचा अंदाज लावते.
यानंतर खराब, फाटक्या नोटांचं नेमकं काय केलं जातं, असा दुसरा प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. स्वच्छ नोट धोरणानुसार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया जनतेला चांगल्या नोटांचा पुरवठा करत असते. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, चलनातून परत आलेल्या नोटांची छाननी केली जाते. त्यात चलनासाठी योग्य नोटा पुन्हा जारी केल्या जातात, तर खराब, मळक्या आणि फाटक्या नोटा नष्ट केल्या जातात.
त्यामुळे नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर हा भारतासह अनेक देशांमध्ये केला जातो. कापसाच्या धाग्यात लेनिन नावाचं फायबर असतं. नोटा तयार करताना कापसासोबत गॅटलीन आणि आधेसिवेस नावाच्या द्रावणाचा वापर केला जातो. यामुळे नोटेचं आयुष्य वाढतं.