परळी – आम्ही कल्याणकारी आहोत की अकल्याणकारी हे जनता ठरवेल पण वैद्यनाथ साखर कारखाना यंदा सुरू होणार की नाही हे अगोदर सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला .
सिरसाळा येथे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्व पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुल चे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले .यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले .
पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना जिल्ह्यात अराजकता पसरली आहे,हे कसले समाजकल्याण मंत्री हे तर अकल्याण मंत्री असल्याची टीका केली होती .त्याबाबत कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला .
“कोणीतरी म्हणलं की अकल्याण मंत्री आहेत,जिल्ह्यात अराजकता माजली आहे,आम्ही अ आहोत की ब आहोत की क आहोत ते जनता ठरवेल पण वैद्यनाथ सुरू नाही झाला तर जिल्ह्यात निश्चितच अराजकता माजेल,मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये,उसाच एक टिपरू सुद्धा शिल्लक राहू देणार नाही .तुम्ही वैद्यनाथ कारखाना सुरू करणार की नाही हे आधी सांगा,आम्हाला नाही सांगितले तरी चालेल पण निदान पत्रकारांना सांगा किंवा एक ट्विट तरी करा अस म्हणत मुंडे यांनी पंकजा यांच्या टिकेला उत्तर दिले.”
बीड जिल्ह्यात मुंडे बंधू भगिनी मधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे,त्यात आता या दोघांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याने उद्याच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .