बीड – अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अखेर पोलीस दलाला आठवडा भरानंतर यश आले आहे.औरंगाबाद येथून सतीश बाळू सोनवणे या शिकाऊ डॉक्टर ला अटक करण्यात आली आहे.नूतन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पदभार घेतल्यानंतर या प्रकरणात तपासात स्वतः लक्ष घालून यंत्रणा कामाला लावली आहे.
शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यातील सीमा हिने पाली येथील तलावात आत्महत्या केली. इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतीश सोनवणे याने शीतल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे.हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली.
शिकाऊ डॉक्टर सोनवणे हा एका गर्भलिंग निदान करण्यासाठी दहा हजार रुपये प्रत्येकी घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी दिली.
सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका गवारे नावाच्या डॉक्टर चा सहकारी म्हणून काम करत होता, तसेच मनीषा सानप ही सोनवणे ला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानप च्या घरी गर्भलिंग निदान केलं जायचं.