अंबाजोगाई – देशातील चौदा राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक ४१ फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाईजवळच्या पिंपळा गावानजीकच्या दूरदर्शन केंद्राच्या ठिकाहून एफएम केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ९ काेटी ६२ लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली आहे. या माहितीला अंबाजाेगाई (पिंपळा) दूरदर्शन केंद्राचे प्रभारी उपसंचालक एस. व्ही. चापुले यांनी दुजाेरा दिला आहे.
अंबाजाेगाईजवळ १० किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी पूर्वीपासूनच दूरदर्शनचा १५० मीटर उंच मनाेरा आहे. इतरही यंत्रणा आहे. पुढील आठ ते नऊ महिन्यात केंद्र सुरू हाेण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशातील इतर ठिकाणच्या तुलनेत अंबाजाेगाईजवळचे केंद्राची क्षमता माेठी असेल. त्यापेक्षा माेठे गुजरातच्या भूजमधील आहे. तेथे २० किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील ज्या राज्यात मान्यता देण्यात आलेली ४१ केंद्र आहेत, त्यामध्ये १, ५, १०, २० किलाे वॅट क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे.
यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू हाेता. राज्यपाल भगतसिंह काेश्यारी, खासदार डाॅ. प्रीतम मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्रव्यवहार, निवेदन देण्यात आली हाेती, असे परळी नगर परिषदेचे माजी स्वीकृत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चेतन साैंदळे यांनी सांगितले.