बीड – पं.राजा काळे यांच्या बहारदार गाण्याने बीडकरांची दिवाळी पहाट सुरेल झाली.शास्त्रीय,उपशास्त्रीय आणि भक्तीसंगीताने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.रसिक फाउंडेशनच्या वतीने या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दिवाळीच्या पहाटे आयोजित करण्यात आलेली मैफिल छान रंगली.राग भैरव गाऊन पं. राजा काळे यांनी आपल्या प्रगल्भ आणि बहारदार गायनाचा प्रारंभ केला. त्यानंतर लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून ‘ लक्ष्मी अष्टक ‘सादर केले आणि ‘ ये री माई आज शुभमंगल गावो ‘ ही राग मियाँ की तोडी मधील रचना गात सुरेल वातावरण निर्माण केले. ‘ तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज ‘ हे नाट्यपद ,’ उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘हा संत नामदेवांचा, ‘अबीर गुलाल उधळीत रंग ‘ हा संत चोखोबांचा अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले.

त्यानंतर त्यांनी माझे जीवन गाणे गाणे ‘हे नाट्यगीत,
‘ माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव ‘ ही स्वतः स्वरसाज चढवलेली रचना, ‘लक्ष्मी वल्लभा दिनानाथा ‘ ही तुकोबांची रचना , ‘जथ्था वैष्णवांचा पंढरीसी जातो ‘, ‘ हरी भजनाविन काळ घालवू नको रे ‘ हे अभंग
‘ का रे ऐसी माया कान्हा लावली मला ‘ ही गवळण सादर करून राग भैरवीतील त्यागराज रचित ‘ सुजन जीवना ‘ ही रामस्तुती सादर करून तीन तास रंगलेल्या मैफिलीची सांगता केली.
त्यांना गायन आणि हार्मोनियमची तयारीची आणि सुरेल साथ त्यांचे शिष्य श्याम जोशी यांनी तर तबला संगत मुकुंद मिरगे,पखवाज संगत बाळकृष्ण खोमणे आणि टाळ संगत सचिन मार्गे यांनी केली. मैफिली संपन्न झाल्यावर पं. राजा काळे यांनी संगीत साधक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर यांनी केले तर ,संस्थापक अध्यक्ष अमर डागा यांनी उपक्रमांची माहिती दिली.सूत्रसंचालन विकास उमापूरकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिक फाउंडेशनचे डॉ.अनुराग पांगरीकर,अमर डागा,मिलिंद सुंदर ,महेश वाघमारे,दीपक कर्नावट,विकास उमापूरकर, प्रदीप मुळे,वाय. जनार्दनराव, राधेश्याम मुंदडा,ईश्वर मुथा ,राम मोटवाणी,सुदर्शन धुतेकर, डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हानकर,सी.ए.गोपाल मालू,डॉ.प्रसन्न कुलकर्णी, विष्णुदास बियाणी यांनी परिश्रम घेतले.मैफिलीस श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.