विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर
सनसनीखेज शोधण्याच्या नादात मीडिया कशाप्रकारे विपर्यास करतो अन अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांना ज्ञात आहेच.अशीच एक ब्रेकिंग न्यूज कालपासून जिल्हाभरातील मिडियामधून सुरू आहे.भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आपलं राजकारण संपवू शकत नाहीत अस वक्तव्य केल्याचा व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवायला सुरवात केली अन पंकजा मुंडे यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली.मात्र व्हिडीओ मधील जो भाग इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवायला सुरवात केली तो अर्धवट असल्याचं संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत.पण जो बिकता है वो दिखता है हे एकमेव ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या मिडिया ने त्यांना हवं तेवढं दाखवलं अन समोरच्या व्यक्तीच प्रतिमा भंजन करण्याची संधी साधली.
आम्ही पंकजा मुंडे यांचे समर्थक किंवा विरोधक नाहीत.त्या सत्तेत असताना किंवा सत्तेतून बाहेर पडल्या तेव्हाही अनेकवेळा आम्ही त्यांना त्यांच्या वक्तव्यावरून त्या कशा चुकीचं बोलल्या हे सांगितले आहे.मात्र जे खर आहे ते खरं म्हणायला सुद्धा हिम्मत अन ताकद लागते.
गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्या दोन तीन वर्षानंतर प्रथमच दोन चार दिवस जिल्ह्यात आहेत अन सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे.
एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले.राजकारणात मोदी हे आज ब्रँड आहेत पण त्यांचे लहानपण खूप गरिबीत,हलाखीच्या परिस्थितीत गेले असे सांगताना मोदी यांनी राजकारणातून वंशवाद संपवण्याचे ठरवले आहे असे सांगितले. मात्र माझे राजकारण मोदी सुद्धा संपवू शकत नाहीत जोपर्यंत मी तुमच्या मनात आहे अन मनावर राज्य करते आहे .
परंतु मीडियाने मोदी सुद्धा माझे राजकारण संपवू शकत नाहीत एवढाच भाग उचलला अन दिवसभर दळण दळायला सुरवात केली.आता मिडियाचं तरी काय चूक आहे म्हणा.पंकजा मुंडे या स्वभावानुसार बोलल्या असतील असच बातमी पाहिल्यावर प्रत्येकाला वाटले.कारण त्या जेव्हा केव्हा बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झालेला असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
परंतु यावेळी त्यांनी जे वक्तव्य केले त्यातील अर्धाच भाग इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवला.या असल्या गोष्टींमुळे टीआरपी वाढतो हे नक्की खर आहे.पण विश्वासहर्ता कमी होते हे या लोकांच्या का लक्षात येत नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियाला जवळून पाहिल्यामुळे आणि अनुभवल्यामुळे एक माहीत आहे की,एका मेंढराने उडी मारली की सगळी मेंढर विचार न करता उड्या मारतात तस इलेक्ट्रॉनिक मिडियाचं आहे.अस एखादं वक्तव्य कोणी केलं किंवा एखादी घटना घडली अन ती दुसऱ्या चॅनलने दाखवली की सगळे त्यासाठी धावपळ करतात. हे करताना स्थानिक प्रतिनिधी चा जीव घेण्याची स्पर्धा सुरू होते.त्या बिचाऱ्याने कितीही पोटतिडकीने खर सांगायचा प्रयत्न केला तरी जो बिकता है वो दिखता है या पद्धतीने सगळे वागतात.
पंकजा मुंडे या स्वभावाने फटकळ आहेत,स्पष्ट बोलतात,भीडभाड ठेवत नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे.पण म्हणून त्यांच्या नावावर काहीही खपवायचे हे कितपत योग्य आहे याच भान मीडियाने ठेवलं पाहिजे.आता अनेकजण आम्ही हे लिहिल्यावर म्हणतील की हा शहाणपणा शिकवणारे आम्ही कोण किंवा आम्हाला काय अधिकार अथवा आम्हाला पाकीट आले असेल म्हणून आम्ही पंकजा मुंडे यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.तर ज्यांना ज्यांना आमच्या इतिहास भूगोलाची माहिती आहे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही परंतु जे खटकलं ते खटकलं अन जे पटलं ते पटलं ही आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे.जिल्ह्यातील पंकजा मुंडे असोत की धनंजय मुंडे अथवा क्षीरसागर घराणे आम्ही नेहमीच जे खर ते लिहिलं.त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या या प्रकरणात देखील आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हे लिहिलं.बाकी कोणताही हेतू नाही हे नक्की .