विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या या सुजलाम सुफलाम असलेल्या नेत्यावर विदर्भ वीरांन मात केली अन मुख्यमंत्रिपद काबीज केलं . पश्चिम महाराष्ट्रातील नेते अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा अद्यापही अपूर्णच आहे तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस या विदर्भवीर माणसानं मुख्यमंत्रीपदी आरूढ होत सर्वच राजकारण्यांना गेल्या साडेचार पाच वर्षात धक्का दिला आहे . राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या कारभाराचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस असावा हा देखील दैवी योगच म्हणावा लागेल .या दोन्ही दिग्गज नेत्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.
या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने म्हणा किंवा राजकारणातील डावपेच म्हणा या दोघांनी पहाटेचा शपथविधी उरकून अवघ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता.एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री पद भूषविणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव राजकारणी असतील.
राजकारणामध्ये शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर ला असतो . त्यामुळे हे दोन्ही नावं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला कायम लक्षात आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षामध्ये राज्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने केलं आणि पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली . शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस हा डिसेंबर महिन्यात असतो तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस 22 जुलैला असतो हा योगायोगच म्हणावा लागेल .
मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणारे फडणवीस आणि मोठ्या पवारांचा वारसा पुढे नेणारे अजित पवार यांचे वाढदिवस ही एकाच दिवशी आहेत राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नागपूर पासून झाली तर अजित पवार या दादा माणसानं राजकारणात पाऊल ठेवलं ते बारामती पासून . सुरुवातीला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत आपला वेगळा ठसा अजितदादांनी उमटवला तर दुसरीकडे नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली ती देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या साडेसात वर्षातील कार्यकाळ पाहिला तर स्वपक्षीय नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांना देखील चांगल्या चांगल्या मुरलेल्या राजकारण्यांना देखील कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत.
फडणवीसांचा कारभार हा पहाटे चार वाजेपर्यंत चालतो सहसा ते राज्याच्या कोणत्याही भागात दौऱ्यावर असले तरी मुक्कामासाठी आपल्या वर्षा निवासस्थानी जायचे. त्याचं कारण रात्री दहानंतर महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या फायली हातावेगळ्या करण्यासाठी वर्षावर पहाटे चार वाजेपर्यंत अधिकाऱ्यांचा राबता असायचा .आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून जनसेवेचे अखंड व्रत या देवेंद्राने अंगिकारल आहे .त्यामुळेच राज्यात सत्तापालट करण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर सर्वांना ते पुन्हा मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा होती,मात्र पक्षादेश शिरसावंद्य मानून त्यांनी मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.
महाराष्ट्रात जलयुक्त शिवार असो की इतर कोणत्याही योजना ,सर्वसामान्य लोकांच्या दारात विकासाची गंगा नेण्याचं काम फडणवीसांनी केल आहे .राज्यातील पहिलाच मुख्यमंत्री असा असेल ज्याने दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार बैठका घेतल्या आणि असा एकही जिल्हा नसेल ज्या ठिकाणी विकासकामासाठी फडणवीस गेले नाहीत. त्यांच्यावर जातीयवादाचा शिक्का लावून त्यांना नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न झाला देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या जाणता राजाने फडणवीसांची जात काढण्यापर्यंत मजल मारली मात्र अशा कुठल्याही टीकेला आपल्या कार्यातून उत्तर देत फडणवीसांनी विरोधकांना नामोहरम केले .
सत्ताधारी असो की विरोधक योग्य काम असेल तर त्यांनी कधीच आडवले नाही देशात 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये आज भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आहे मात्र या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे लाडके कोणी असतील तर ते आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस . सलमान ज्या पद्धतीने म्हणतो की ‘मैने एक बार कमिटमेंट कर ली तो मै अपने आप की भी नही सुनता ‘तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकदा निर्णय घेतला की तो बदलला आहे असे त्यांच्या पाच वर्षात पाहायला मिळाले नाही.
फडणवीस यांनी आपल्या कारभाराचा जसा वेगळा ठसा राज्यात उमटवला तसाच काहीसा एक वेगळा थाट अजित पवारांनी मिरवला असं म्हणायला हरकत नाही. अजित पवार यांना राजकारणात दादा म्हणूनही संबोधले जात. कदाचित त्यांच्या स्वभावाला अनुसरून हे नाव असावं. अजित म्हणजे सर्व आघाड्यांवर विजय मिळवणारा अशाच पद्धतीने पंधरा वर्ष राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना अजित पवारांनी स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील अनेक आघाड्यांवर आपली निरंकुश सत्ता कायम ठेवली.
जे आहे ते थेट आणि रोखठोक बोलून मोकळं व्हायचं इतरांना काय वाटेल याचा विचार न करता निर्णय घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते काही वेळा अडचणीतही आले मात्र अजित पवारांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकही शब्द पाळण्याबद्दल अजित पवारांचं पाठीमागे देखील कौतुक करतात कारण त्यांना एखादं काम सांगितलं तर ते तातडीने झालंच पाहिजे असा त्यांचा स्वभाव आहे. आजही मंत्रालयातील नव्हे तर राज्यातील महसूल अधिकारी अजित पवार यांचं नाव निघताच आदरयुक्त भीतीने थरथर कापतात. प्रचंड अभ्यास राजकारणावरील घट्ट पकड यामुळे अजित पवार हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित झालं .दुष्काळी मराठवाड्याला गोदावरी नदीवर बॅरेजेस बांधून सुजलाम सुफलाम करण्याचा अजित पवारांचा निर्णय मराठवाड्यातील जनता कधीच विसरू शकणार नाही.
भलेही त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे हे बदनाम झाले असतील परंतु वरून नारळासारखा दिसणारा हा माणूस आतून मात्र मृदू आहे असाच अनेकांचा अनुभव आहे
राजकारण म्हणलं की टीकाटिपणी आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच मात्र आरोप करताना ही पातळी सोडली नाही पाहिजे हे कायम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवल आहे .लोकसभेच्या काळात आपल्याच पक्षातील एका महिला कार्यकर्तीने फडणवीस आणि मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू केल्यानंतर तिला मध्येच थांबवत टीका करतानाही भाषा सभ्य वापरा असा वडिलकीचा सल्ला अजित पवारांनी दिल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांचं नावही यांनी आदराने घेतल आहे . शरद पवार असोत की विखे पाटील विकासाच्या कामांमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता निसंकोचपणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सल्ला घेतला आहे.
या दोन्ही नेत्यांच्या स्वभावात मोठा फरक आहे,अजित पवार थेट बोलणारे तर देवेंद्र फडणवीस हसून काम करणारे आहेत, मात्र आपल्या आपल्या पक्षात आज या दोघांचे स्थान अढळ आहे हे निश्चित .राजकारणात विरोधकांना कसे रोखायचे यावर विरोधकांनी फडणवीस यांच्याकडे क्लास लावायला हवेत .कारण प्रत्येक अधिवेशनापूर्वी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना माझ्याकडे तुम्ही मारलेल्या डल्याच्या फाईली आहेत अस छातीठोकपणे सांगणारा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस होय .तसेच विरोधीपक्ष नेता असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सळो की पळो करून सोडणारे देखील फडणवीस होते हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.फडणवीस यांनी प्रशासनामध्ये जे मोठे बदल केले त्यामुळे ते कायम लक्षात राहतील .
राज्याच्या राजकारणावर आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या या नेत्यांमधील एकाने साठी ओलांडली आहे तर दुसरा पन्नाशीच्या घरात पोहचला आहे,या दोन्ही नेत्यांच्या हातून महाराष्ट्राचे महान राष्ट्र व्हावे,राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !