विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर
जिथं सर्वसामान्य माणसांची बुद्धी किंवा वैचारिक पातळी संपते तिथून पुढं राजकारणी लोकांची सुरू होते अस म्हणतात याचा अनुभव गुरुवारी तमाम महाराष्ट्राने घेतला.अडीच वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राजकारणातील तथाकथित भीष्माचार्य शरद पवार या सगळ्यांनाच भाजपच्या विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या एका निर्णयाने असा धक्का दिला की अजूनही ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत.अमित शहा यांनी एका दगडात दोन पक्षी नव्हे तर तीन पक्ष आणि फडणवीस हे गारद केले आहेत.कोणी याला मास्टरस्ट्रोक म्हणेल कोणी धक्कातंत्र मात्र माझ्या दृष्टीने हा शहा यांचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे.याचे दूरगामी परिणाम शिवसेनेवर होणार हे निश्चित आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई आणि महाराष्ट्रासारखे राज्य हातात असावे अशी कोणत्याही पक्षाची महत्त्वाकांक्षा असते.तशी ती भाजपची देखील आहे.1995 ते 99 या चार वर्षाच्या काळात शिवसेनेसोबत लहान भाऊ म्हणून काम करत असताना भाजप कधी मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला हे त्यांनाच काय पण शिवसेनेला देखील कळले नाही.तब्बल 25 वर्ष एकत्र असणारे सेना भाजप हे पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाल्यावर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.2014 ते 2019 पर्यंत भाजपने विशेषतः मोदी शहा या जोडगोळीने शिवसेनेचे जु बळजबरीने आपल्या खांद्यावर वागवले.त्या पाच वर्षांच्या काळात शिवसेना सत्तेत असून सुद्धा भाजपला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.स्थानिक पातळीवरील निवडणूक असो की राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रत्येकवेळी भाजपला आणि त्यांच्या शिर्षस्थ नेतृत्वाला मातोश्रीवर कुर्निसात घालावा लागत असे.
मात्र मोदी शहा यांच्या उदयानंतर हे चित्र हळूहळू बदलले.2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसमोर आपली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केली.त्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत बंद दाराआड जे काही घडले (प्रत्यक्षात घडले की नाही हे त्या दोन पक्षाला माहीत) त्यावरून सेनेने ताठर भूमिका घेतली.भाजपचे 106 आमदार निवडून आल्यानंतर देखील 25 वर्षांची मैत्री भंग पावली अन हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन 50 – 52 वर्ष लढलेली शिवसेना एका झटक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली.
या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर विशेषतः अमित शहा यांच्यावर जी विखारी टीका केली ती शहा यांच्यासह भाजपच्या वर्मी लागली.मात्र भाजपने हे विष पचवले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी चा संसार फारकाळ टिकणार नाही अस सगळ्याच राजकीय धुरीणांना वाटत होते.पंरतु शरद पवार नावाच्या माणसाने हे करून दाखवले.गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी मध्ये अनेकवेळा छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या.पण फेविकोल चा मजबूत जोड पवारांनी बांधून ठेवल्याने आघाडी सरकार पडत नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले.
या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना असो की उद्धव ठाकरे अथवा संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. कलम 370 असो की उत्तरप्रदेश मधील घटना प्रत्येकवेळी सेनेने मोदी आणि शहा यांच्यावर शरसंधान साधले.या काळात मोदी अन शहा हे दोघेही शांत होते पण ही वादळापूर्वीची शांतता होती हे आता उद्धव ठाकरे अँड कंपनीला जाणवले असेल.
2014 पासून शिवसेनेचा वाढत असलेला त्रास,शाब्दिक हल्ले,थेट व्यक्तिगत पातळीवर येऊन केली जाणारी टिका हे सगळं मोदी अन शहा शांतपणे पाहत होते.राजकारणात संयम लागतो अन योग्य संधीची वाट पाहावी लागते हे या जोडीने दाखवून दिले.हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजपसोबत राहिलेल्या शिवसेनेने जेव्हा भाजपलाच शिंगावर घेतले तेव्हा एक न एक दिवस हे होणार हे सगळ्यांनाच अपेक्षित होते. मात्र शिवसेना या पध्दतीने मुळासकट उपटून काढली जाईल याची कोणीच कल्पना केली नसेल.
कोणी काहीही म्हणले तरी राज्यातील महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या बुडाखाली जो काही स्फोट झाला त्यामागे भाजपचं होता हे आता काही लपून राहिलेले नाही.शिवसेनेत एकछत्री अंमल राहिलेला नाही हे शहा यांच्यासारख्या पारखी राजकारणी माणसाच्या नजरेतून सुटले असेल असे होऊच शकत नाही.शिवसेनेत एकनाथ शिंदे अँड कंपनी नाराज आहे हे अनेकवेळा दिसून आले.शहा यांनी या नाराजीला खतपाणी घातले.योग्यवेळेची वाट पाहिली आणि शिवसेनेच्या गंडस्थळावर वार केला.हा वार एवढा भीषण होता की शिवसेना उन्मळून पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वसंत दादा पाटील यांना धक्का देऊन आपलं सरकार स्थापन केल होतं, मात्र त्यावेळी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती.आज मात्र अमित शहा यांनी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती तयार केली आहे.शिवसेनेतील बंडाळी एवढी वाढली की स्वतःचा पक्ष अन चिन्ह वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.अन यालाच माझ्या भाषेत राजकीय सर्जिकल स्ट्राईक म्हणतात.
आमच्या बापाचा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे अँड कंपनी आजपर्यंत सांगत होते मात्र आता हाच बापाचा पक्ष भाजपने हायजॅक करून एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात नेऊन दिला आहे.आज उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याच पक्षातील लोकांवर कारवाई करण्याची अन स्वतःचे पद सोडण्याची वेळ शहा यांनी आणली.
हा झाला सत्तानाट्याचा किंवा सुडनाट्याचा पहिला अंक.या अंकात शिवसेनेत अस्तित्वासाठी धडपडण्याची वेळ आणल्यावर अमित शहा यांनी दुसऱ्या अंकात मी म्हणजे भाजप,मी म्हणजे सर्वशक्तिमान हा समज असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जोरदार तडाखा दिला.एकनाथ शिंदे यांच्या बंडा अगोदर 10 जून रोजी झालेली राज्यसभा निवडणूक आणि 20 जून रोजी झालेली विधानपरिषद निवडणूक यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो काही चमत्कार केला त्यामुळे मोदी शहा यांच्या समोर देखील मोठे आव्हान भविष्यात उभे राहणार याची चाहूल त्यांना लागलीच असणार.106 आमदार पाठीशी असताना फडणवीस यांनी राज्यसभेत तिसरा आणि परिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणला.
या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेत उभी फूट पडणार आहे हे मात्र फडणवीस यांच्या गावी नसावे.कारण हे सगळे बंडखोर मुंबईवरून थेट सुरत ला अन तेथून थेट गुवाहाटी ला गेले.या दोन्ही ठिकाणी सीआर पाटील आणि हेमंत बिस्वा सर्मा सारखे लोक या बंडखोरांच्या दिमतीला होते.त्यांना केंद्राने सुरक्षा पुरवली होती.म्हणजेच दुसऱ्या अंकात शहा यांनी बंडखोरांना सांभाळताना फडणवीस यांच्या समोर देखील नवे आव्हान उभे केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचा चौखूर उधळत निघालेला वारू रोखायचा असेल अन उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या बंडखोराला मुख्यमंत्री पदी बसवले पाहिजे हे अमित शहा यांनी लक्षात घेतले अन सगळ्यांनाच धक्का दिला.स्वतः शिंदे यांना देखील आपण मुख्यमंत्री होऊ ही खात्री नसेल पण भाजपच्या मोदी शहा जोडीने हे करून दाखवले.
नरेंद्र मोदी यांच्या अत्यन्त विश्वासातील म्हणून राज्य भाजपमध्ये अनभिषिक्त अधिकार असलेले देवेंद्र फडणवीस हे 2029 ला का होईना पण आपल्या वाटेतील अडसर ठरतील हे शहा यांनी वेळीच ओळखले अन त्यांना नव्या सत्ता नाट्यात त्यांची जागा दाखवली.भाजपच्या विशेषतः मोदी शहा यांच्या राजकारणात आजपर्यंत आसाम आणि बिहार या ठिकाणीच त्यांनी आपल्या पक्षाकडे महत्वाचे पद न घेता राजकीय डाव खेळले आहे.हेमंत बिस्वा सर्मा हे दुसऱ्या पक्षातून आलेले पण त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं तर बिहार मध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाला कमी जागा मिळून देखील मुख्यमंत्री पदी त्यांची निवड केली गेली.
राज्यातील सत्ता नाट्य सुरू असताना महाविकास आघाडी असो की भाजप अथवा सर्वसामान्य माणूस किंवा चांगले चांगले राजकीय जाणकार या सगळ्यांना तोंडावर आपटून शहा यांनी मोठा धमाका केला.बंडखोरी केल्यानंतर तुम्हाला भाजप मुख्यमंत्री पद देणार आहे का?तुम्ही राज्यात येऊन दाखवा?देवेंद्र फडणवीस हे सत्तापिपासू आहेत,भाजपने मुख्यमंत्री पदासाठी हे सगळं केलं,आम्ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं ही जी काही मुक्ताफळे शिवसेनेने उधळली होती,ती शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवून अमित शहा यांनी एका झटक्यात धुळीला मिळवली आहेत.
शिंदे मुख्यमंत्री झाल्याने आता शिवसेना कोणाची हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हे गणितच आता बदलून गेले आहे.शिवसेनेतील तब्बल 40 आमदार बाहेर काढून पक्षाची मालकी दुसऱ्याच्या पदरात टाकण्याचे काम शहा यांनी केले आहे.शिवसेना म्हणल्यावर मोदी शहा देखील आपला रस्ता बदलतात अस म्हणणाऱ्या संजय राऊत यांना देखील या धक्यातून कस सावरायच हे कळेना झालं आहे.
ज्या शिवसेनेने अमित शहा अन नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध टिका करून करून हैराण केले होते त्या शिवसेनेला गुडघ्यावर नव्हे तर जमिनीवर आणण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.’हम हम है बाकी सब पाणी कम है’हे शहा यांनी दाखवून दिलं आहे.उद्धव ठाकरे यांना तर सोडाच पण पन्नास वर्षांपासून राज्याच्या अन देशाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवार यांना देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अन भाजप त्याला समर्थन देईल असे वाटले नव्हते.पवार देखील या खेळीने हादरून गेले आहेत.राजकारणाच्या मैदानावर समोरच्या खेळाडूच्या दांड्या कशा उडवायच्या अन पराभवाकडे चाललेला सामना कसा खेचून आणायचा हे पवार यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूला चांगलं माहीत आहे.पण अमित शहा यांच्या गुगलीने पवार,ठाकरे अन फडणवीस या तिघांच्या दांड्या गुल केल्या आहेत.अजूनही या तिघांना कळलेलं नाही की बॉल नेमका कसा टाकला अन आपण आउट कसे झालो.असो या सत्तांतरामुळे आता शिवसेना कोणाची,मुंबई महापालिकेसह इतर निवडणुकीत काय होणार?फडणवीस 2024 ला पुन्हा येणार का?असे अनेक प्रश्न उभे राहिले असून त्याची उत्तर येणाऱ्या काळात मिळतील अशी अपेक्षा करूया.