October 5, 2022

अकेला देवेंद्र और क्या क्या करेगा !!

अकेला देवेंद्र और क्या क्या करेगा !!

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणात एकतर शब्द देऊ नये अन दिला तर तो शब्द शेवटपर्यंत पाळावा तरच तुम्ही सर्वमान्य नेते होऊ शकता हे सत्य आहे.अन या सत्याच्याच आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या आखाड्यात पवार आणि ठाकरे यांच्यासारख्या पहिलवानांना धूळ चारली. फडणवीस यांच्या खेळीने महाविकास आघाडी अजूनही भानावर येऊ शकलेली नाही हे  विशेष.अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे यांना सहयोगी पक्ष आणि अपक्षांच्या मनात आपला शब्द ठसवण्यात यश आलेले नाही तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अडीच वर्षे सत्तेबाहेर असूनसुद्धा केवळ शब्दावर यश कसे मिळवायचे हे दाखवून दिले आहे.

एका विजयाने कोणी किंगमेकर ठरत नाही किंवा एका पराभवाने कोणाचं राजकीय आयुष्य उध्वस्त होत नसतं. मात्र विजयासाठी जी मेहनत घेतली जाते त्याला अन त्याच्या स्ट्रॅटेजी ला सॅल्युट करावाच लागतो.राज्यसभा निवडणुकीत जे निकाल लागले त्यावरून अडीच वर्षे सत्तेत असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर छोटे पक्ष आणि अपक्षांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे अडीच वर्षे सत्तेबाहेर असूनसुद्धा अपक्ष असो की स्वपक्षीय आमदार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची ट्युनिंग मजबूत असल्याचे दिसून आले आहे.देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा आजही कायम असल्याचं यावरून स्पष्ट झाले आहे. या विजयाने फडणवीस यांचे दिल्लीतील वजन देखील वाढलं आहे हे नक्की.

राज्यसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.कारण सामना होता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द असणारे शरद पवार यांच्यात.गेल्या पन्नास वर्षात ज्यांनी ज्यांनी पवार यांच राजकारण जवळून पाहिलं आहे त्यांना पवार किती धूर्त आणि चाणाक्ष आहेत हे सांगायची गरज नाही.
बुद्धिबळाच्या पटावर कोणती चाल कशी खेळायची,कोणाला आपल्याकडे कसे ओढायचे,कोणाला कसं मॅनेज करायचं अन कस डॅमेज करायचं हे पवार यांना चांगलंच माहीत आहे.पवार एखाद्याकडे बघून हसले किंवा त्यांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच अस सर्वांना ज्ञात आहे.राज्याच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत खडा न खडा माहीत असलेले पवार राजकीय धुरीण आहेत.त्यांच्या खेळीच आकलन चांगल्या चांगल्याना होत नाही.


देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पावलोपावली नामोहरम करण्याची एकही संधी पवार यांनी सोडली नाही.मग छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विषय असो की मराठा आरक्षणाचा विषय.प्रत्येकवेळी पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा,शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संघाच्या मुशीत तयार झालेले फडणवीस देखील प्रत्येकवेळी त्यातून सहजपणे बाहेर पडले आहेत हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.


2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असताना पवार यांनी ऐनवेळी आपली चाल बदलली अन महाविकास आघाडीचा जन्म झाला.अशक्य ते शक्य करतील पवार अस पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं.हातातोंडाशी आलेला भाजपचा घास पवार यांनी हिरावून घेतला.25 – 30 वर्षांपासून राजकीय शत्रू असणाऱ्या शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची मोट एकत्र बांधत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवले.मात्र हे करताना पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजकारणाचे सगळे डाव शिकवले नाहीत.उद्धव ठाकरे हे हिंदुत्व,मराठी माणूस यक्तच अडकून राहिले.त्यामुळे त्यांचे त्यांच्या पक्षात देखील वजन राहिले नाही.


गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर स्वपक्षातीलच आमदार मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले.पक्ष बांधणी तर दूरच पण आपल्या पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी देण्यास देखील उद्धव ठाकरे कमी पडले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या छोट्या पक्षांचा आणि अपक्षाचा हिरमोड झाला.जे उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते अपक्षाना काय न्याय देणार ही भावना अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात बळावली होती.


राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अगोदर छत्रपती संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरून भाजपला घेरण्याचं काम महाविकास आघाडीने केलं,मात्र भाजपने धनंजय महाडिक यांच्या रूपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला अन महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे 54,राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आणि काँग्रेसचे 44,सहयोगी पक्ष,एमआयएम आणि अपक्ष अशी महाविकास आघाडीची गोळाबेरीज 172 च्या घरात जात होती.त्यामुळे मोठमोठ्या राजकीय धुरीणांना भाजपचा विजय होईल याची सुतराम शक्यता वाटत नव्हती.त्यातच महाविकास आघाडीची सर्व सूत्र पन्नास वर्षाचा राजकीय डावपेचांचा अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याकडे होती.त्यामुळे संजय राऊत,संजय पवार,इम्रान प्रतापगढी आणि प्रफुल पटेल यांचा विजय सहज होईल असे कागदावर तरी दिसत होते.


महाविकास आघाडीने रिस्क नको म्हणून चार दिवसापासून आपल्या आणि सहयोगी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते.दुसरीकडे भाजप मात्र खूपच शांत अन निवांत असल्याचे चित्र होते.मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती हे निकालानंतर स्पष्ट झाले. भाजपने सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती.त्यांच्याच म्हणण्यावर महाडिक यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या विजयाची जबाबदारी फडणवीस यांच्यावरच टाकण्यात आली होती.फडणवीस यांनीदेखील कुठलाही अतेतायीपणा न करता पवार अँड कंपनीचा डाव उधळून लावला.
एकीकडे पवार यांनी काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा कोटा 44 करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे फडणवीस यांनी आपले पत्ते शेवटपर्यंत खुले केलेच नाहीत.जेव्हा निकाल हाती आला तेव्हा फडणवीस यांची खेळी पाहून पवार यांच्यासह उद्धव ठाकरे आणि काँग्रेस चे नेते अवाक झाले.या धक्यातून ते दुसऱ्यादिवशी पर्यंत सावरुच शकले नाहीत.


भाजपच्या संख्याबळाच्या विचार केला तर 106 अधिकृत आणि 7 अपक्ष अशी 113 ची संख्या भाजपकडे होती.मात्र प्रत्यक्षात भाजपच्या तिन्ही उमेदवारांना मिळून 123 मते मिळाली.याचाच अर्थ दहा मते अधिकची मिळवण्यात फडणवीस यशस्वी झाले. त्याला एकमेव कारण फडणवीस यांची क्लिन इमेज अन दिलेला शब्द पाळण्याची सवय.महाविकास आघाडीच गणित इथंच फिस्कटलं. पवार यांनी शब्द दिला तर ते पाळतील की नाही याची शाश्वती नाही,दुसरीकडे जे ठाकरे आपल्याच पक्षाच्या आमदारांना भेटत नाहीत,म्हणणे ऐकून घेत नाहींत  ते आपल्याला दिलेला शब्द काय पाळणार अन त्यांच्यात ती धमक तरी आहे का हा विषय.त्यामुळे एमआयएम,बच्चू कडू यांचा प्रहार आणि पाच सहा अपक्ष यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.


दुसरीकडे फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत नाराज अपक्ष आमदारांना गळाला लावण्यात यश मिळवले.हे करताना फडणवीस यांच्याबद्दल असलेला विश्वास दिसून आला.निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जी आकडेवारी समोर आली त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आजही आमदारात कमालीची आस्था अन त्यांच्या शब्दावर विश्वास असल्याचे दिसून आले.दुसरीकडे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर मात्र विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर पर्यंत राज्याचं राजकारण हे शरद पवार यांच्याभोवती कायम फिरायचे,कोणत्याही चांगल्या वाईट राजकीय घटनेमध्ये पवार यांचा हात असेल अस म्हटलं जायचं.म्हणजेच वर यांची राजकीय दहशत होती.अलीकडच्या काळात मात्र पवार यांच्या बरोबरीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला जातो.राजकीय उलथापालथ होणार असेल तर फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असते.म्हणजेच यापुढच्या काळात फडणवीस हे पवारांच्या पुढचे राजकीय धुरीण म्हणून ओळखले गेल्यास आश्चर्य वाटायला नको.


या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला मात्र याला राजकीय भाषेत कोल्ह्याला द्राक्ष आंबट किंवा अंगुर खट्टे अस म्हटल्यास वावग ठरणार नाही.एकूणच काय तर पन्नास वर्षांपासून राजकीय गणित मांडून आपलं स्थान अढळ ठेवणाऱ्या पवार अन अचानकपणे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राजकीय धुरीनाने हम हम है बाकी सब पाणी कम है हेच दाखवून दिलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click