March 30, 2023

गोपीनाथ मुंडे आज असते तर ….!

गोपीनाथ मुंडे आज असते तर ….!

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर, बीड.

गोपीनाथ पांडुरंग मुंडे , कायमस्वरूपी मागासलेला हा शिक्का कपाळी घेवून मिरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील नाथरा सारख्या गावातून 60 – 70 च्या दशकात हा तरुण पुढे येतो अन दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारतो.ऊसतोड कामगारांच्या पोटी जन्म घेतलेल्या या व्यक्तिमत्वाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वास हा सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी वेचला. काळांन घात केला अन आठ वर्षांपूर्वी होत्याच नव्हतं झालं.मराठवड्याचं मागासलेपण पुसून टाकण्याचे दिवस आलेले असताना मुंडे नावाचा हा लोकनेता सगळ्यांना सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला.आठ वर्षानंतर देखील एकच प्रश्न मनात येतो,साहेब आज तुम्ही असते तर ! अनेकांची दुकानं बंद झाली असती,नवे नेतृत्व उदयाला आले असते,केंद्रात अन राज्यात एकाच विचाराचे सरकार राहिले असते अन मराठवाड्याला पुन्हा एकदा तुमच्या रूपानं मुख्यमंत्री पद मिळालं असतं.


72 चा दुष्काळ पाहिलेली आमची पिढी आहे.रक्ताचं पाणी अन दाताच्या कन्या करून आम्ही दिवस काढले आहेत.संघर्ष आमच्या पाजविला पुजला होता असं भेट झाल्यावर आवर्जून सांगणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना नियतीने कुठलीच गोष्ट सहजासहजी दिली नाही.मात्र कितीही मोठा संघर्ष वाट्याला आला तरी न डगमगता या पठयाने यश मिळवलेच.


सहकार क्षेत्र म्हणजे काँगेस ची मक्तेदारी अन ही मक्तेदारी मोडून काढण्याच स्वप्न मुंडेंनी पाहिलं अन 30 पेक्षा अधिक साखर कारखाने उभारून ते प्रत्यक्षात आणून दाखवलं.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये मुंडेंनी वैद्यनाथ ला मंजुरी मिळवली अन त्या दिवशीपासून ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता कायमचा काढून ठेवण्यासाठीचा मुंडेंचा प्रवास सुरु झाला.केवळ वंजारी समाजाचं नव्हे तर समस्त ओबीसींना एकत्र आणण्याची ताकद या माणसात होती अन या ताकदीच्या जोरावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना हादरे दिले.


राज्याच्या राजकारणात आपलं नाव मोठं केलेल्या मुंडेंना केंद्रात संधी मिळाली.ग्रामविकास सारख खात मिळालं,या खात्याच्या माध्यमातून माझ्या भागातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांनी संकल्प केला.मात्र जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला याप्रमाणे गोपीनाथ पांडुरंग मुंडे नावाचं वादळ 3 जून 2014 रोजी शांत झालं. लाखोंच्या डोळ्यात अश्रू ठेवून हा हिमालयाची उंची असलेला माणूस पोरक करून निघून गेला.


त्यांच्या जाण्याने राजकारणातच नव्हे तर समाजकारणात देखील मोठी पोकळी निर्माण झाली. आज जर गोपीनाथ मुंडे असते तर ते नक्कीच 2014 साली मुख्यमंत्री झाले असते.कारण त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे होते.ऊसतोड मजुराला सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांना खूप काही करायचं होतं. मुंडे केंद्रातून परत आले असते का? आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उदय झाला असता का? असे अनेक प्रश्न आजही चर्चिले जातात.


गोपीनाथ मुंडे हे आज असते तर कदाचित महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची संधी शरद पवार यांना मिळाली नसती.शिवसेने सोबतचा जो 25 वर्षाचा संसार होता त्याचा काडीमोड झाला नसता.राजकारणात जर तर ला महत्व नसत अस म्हणतात.पण गोपीनाथ मुंडे असते तर खूप काही चांगलं झालं असतं, विशेषतः बीड अन मराठवाड्यात अनेक मोठे प्रकल्प आले असते.आयआयएम,आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्था आल्या असत्या.लाखो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं असत.आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणाऱ्या औरंगाबाद सारख्या शहराला मोठं महत्व प्राप्त झालं असत.


मुंडे असते तर एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई झाली नसती ना चिक्की घोटाळा पुढे आला असता ना धनंजय मुंडे विरोधीपक्ष नेते झाले असते.मुंडे असते तर अपघाताने का होईना खासदार होण्याची वेळ आलेल्या प्रीतम मुंडे यांना राजकारणात यावं लागलं नसतं. एक ना अनेक शक्यता आहेत,महाराष्ट्र एका नव्या प्रगतीच्या वाटेवर दिसला असता.


गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर कदाचित केंद्रात राहून त्यांच्यावर राज्यातील पक्षीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली गेली असती.मुंडे यांची अकाली एक्झिट अनेक प्रश्न निर्माण करून गेली किंवा मुंडेंच्या जाण्यामुळे राज्याचे मोठे नुकसानच झाले.मुंडे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात कधीच रिव्हेंज पॉलिटिक्स केलं नाही.सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेला त्यांचा टॉक अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवायला मदत करत असे.


निधड्या छातीने संकटांना सामोरे जाणाऱ्या या नेत्याची आजही पावलोपावली आठवण येते त्याला त्यांचं आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे.या लोकनेत्याला विनम्र अभिवादन !

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click