February 2, 2023

डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !

डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !


लक्ष्मीकांत रुईकर / बीड
सचिन वाझे ,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणामुळे राजकारणातील गुन्हेगारी आणि खाकीच्या आडून सुरू असलेली वसुली हे गंभीर विषय प्रथमच सामान्य माणसासमोर आले आहेत .तस पाहिलं तर सगळ्या लोकांना माहीत आहे की पुढारी अन अधिकारी हे मिळून मिसळून वागतात,पण लेटरबॉम्ब ने राज्याच्या राजकारणाचा अन पोलीस दलाचा जो काळाकुट्ट चेहरा उघड केला आहे तो मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे .या सगळ्या प्रकरणामुळे डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी हे चर्चेत आले आहेत .

देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत चा इतिहास चाळून पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे राजकारणातून पैसा अन पैशातून राजकारण या गोष्टी जगन्मान्यता असलेल्या आहेत .त्यात राजकारणी लोकांना अधिकाऱ्यांची साथ असते त्यामुळे हे दोघेही मिळून जेसीबीनच काय पण पोकलंड ने पैसा खातात .


साधा गावचा सरपंच व्हायचं असेल तर लोक कोटी कोटींची बोली का लावतात हे आता जनतेला कळून येईल .निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा पाच पन्नास लाखाची घालून दिली आहे,खर्च सादर करताना ही मर्यादा पाळल्याचे दाखवले जाते,प्रत्यक्षात होणारा खर्च मात्र अमर्याद असतो पण त्याच्याशी ना जनतेला काही देणंघेणं असत ना राज्यकर्त्यांना ना प्रशासनाला .


पकडला गेला तो चोर नाहीतर सगळे साव असाच कारभार आहे .राजकारणात आलेला साधा चिल्लर फाटका कार्यकर्ता जेव्हा वर्षभरातच मोठमोठ्या चारचाकी गाड्या उडवत फिरतो ना तेव्हाच हे काय आहे हे दिसून येत .पण हमाम मे सब नंगे अस असल्याने कोणीच काहीच बोलत नाही .
राज्याच पोलीस दल असो की देशाचं इथं काय चालत हे सगळ्यांना माहीत आहे .कॉन्स्टेबल ची भरती असो की बदली अथवा एखाद्या क्रीम पोस्टवर जायचं असेल तर दिवसाढवळ्या लक्ष्मी दर्शन केल्याशिवाय पान देखील हलत नाही .

पोलीस दल तर कलेक्शन, तोडीपाणी,मिटवा मिटवी यासाठी सगळ्यात बदनाम असलेले खात आहे .कॉन्स्टेबल असो की पीआय चा मुन्शी हे पीआय ला महिन्याकाठी किमान पाच ते दहा लाख गोळा करून देण्याच्या क्षमतेचे निवडले जातात .स्थानिक पातळीवर सगळ्यात जास्त कलेक्शन करणारी ब्रँच म्हणजे एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखा,या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून प्रत्येक जण पाहिजे तेवढी किंमत मोजायला तयार असतो .कारण मटका असो की गुटखा किंवा वाळू अथवा अवैध धंदे या सगळ्यातून कोट्यवधी रुपये कलेक्शन मिळते .मग हे एकट्याच्या पदरात पडत का तर निश्चितच नाही .यात डीवायएसपी, अडिशनल एसपी,एसपी यांचा हिस्सा ठरलेला असतो .एसपी ला पैसे मिळाले की त्यांनाही वाटेकरी असतात ,त्या विभागाचा आयजी,डिजी यांनाही महिना ठरलेला असतो .


हे झालं सगळं जिल्हा पातळीवर, मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात तर साधा कॉन्स्टेबल महिन्याला किमान दोन पाच लाख कमावतो म्हणल्यावर एपीआय किंवा पीआय किती कमवत असतील याचा हिशोब लावल्यास डोळे पांढरे होतात .त्याच्या वर बसलेले आयजी,एसीपी, डीसीपी,सिपी हे सगळे सुद्धा आपआपल्या मार्गाने पैसे कमवण्यात व्यस्त असतात .राज्यात,विभागात,जिल्ह्यात, शहरात कोण डॉन आहे,कोण वाळू माफिया आहे,कोण गुटखा माफिया आहे,कोणाचे पत्याचे क्लब आहेत ,कोण मटक्याचा बुकीं आहे हे सगळं पोलीस दलाला माहीत असतं.

सामान्य माणसाचा मोबाईल चोरीला गेला तर पोलिसांनी ठरवलं तर अर्ध्या तासात मोबाईल मिळू शकतो मात्र त्यासाठी तपास करण्याची त्यांची तयारी नसते कारण मोबाईल चोरकडून हप्ता ठरलेला असतो .
सामान्य माणूस तक्रार घेऊन ठाण्यात गेला तर त्याला झक मारली अन मुंबई पाहिली अस वाटू लागतं,तुम्ही कुठं गेला होतात,का गेला होतात,एवढा महागडा मोबाईल सांभाळता येत नाही का,घरात एवढे पैसे कसे आले,सोन कुठून आणलं होतं हे सगळे प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडलं जात .वर पुन्हा मिटवून घ्या ची भाषा ठरलेली असते .


पोलिसांनी ठरवलं तर मोबाईलच काय पण सामान्य माणसाच्या घरातून सुई ची देखील चोरी होऊ शकत नाही,पण प्रत्येकाला वसुली च टार्गेट दिलेलं असल्याने ते पूर्ण करण्याच्या नादात मुख्य कामाकडे दुर्लक्ष होतं .मुंबई मध्ये किंवा ठाणे,पनवेल अथवा मोठ्या शहरात बदली मिळावी म्हणून आयजी डिजी पासून एसपी पी आय पर्यंत लॉबिंग केली जाते अन इथं महत्वाचा रोल येतो तो राजकारणी मंडळींचा .


कोणत्या जिल्ह्यात कोण एसपी,डिसिपी द्यायचा,कोण कलेक्टर, कोण डेप्युटी कलेक्टर द्यायचा हे त्या त्या आमदार,पालकमंत्री यांना विचारलं जात .मग हे लोक या यंत्रणेचा पाहिजे तसा वापर करून घेतात .कारण अवैध धंदे करणारे हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, उपप्रमुख,पदाधिकारी किंवा चट्टे बट्टे असतात .मग त्यांना संरक्षण नेता देतो,नेत्याला आपलं ऐकणारे उठ म्हणलं की उठणारे बस म्हणलं की बसणारे अधिकारी लागतात .अन मग सुरू होतो एकमेकांच्या साथीने जनतेचा पैसा ओरबडण्याचा खेळ .

यापूर्वी देखील वरिष्ठ पोलिस अधिकारी सुबोध जैस्वाल यांनी पोलीस दलातील बदल्या बाबत काय काय व्यवहार होतात हे स्पष्टपणे सांगितले होते तसेच वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देखील या गोंधळाबाबत तक्रार केली होती,मात्र काहीही झालं तरी आम्ही नागवे आहोत,त्यामुळे कारवाईची अपेक्षा ठेवू नका असा निर्धार करूनच राजकारणी खुर्चीवर बसलेले असल्याने अखेर परमवीर सिंग यांचा ट्रेलर रिलीज झाला .


मुंबई सारख्या शहरात एक सचिन वाझे सारखा साधा एपीआय सारखा अधिकारी 2007 ला पोलीस दलातून खंडणी प्रकरणात निलंबित होतो,2020 पर्यंत खात्याबाहेर राहतो अन नंतर त्याला पोलीस दलात घेतलं जातं .लाज कशी वाटत नाही या लोकांना .बर हा माणूस काही जाणीवपूर्वक गुंतवला गेला असंही नव्हतं .धडधडीत पुरावे असताना त्याला घेण्यामागे काय हेतू होता .आज जे गृहमंत्री तोंड वर करून हे सगळं परमविर सिंग ने केलं अस म्हणत आहेत ,ते वाझे ला घेताना झोपले होते का असा प्रश्न पडतो .त्याला घेतल्यावर सगळी सूत्र त्याच्याकडे का दिली हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आज सुटतो,वाझे सारखा एपीआय गाडीत नोटा मोजण्याच मशीन का घेऊन फिरतो हे आज स्पष्ट होत आहे .

अरे हा माणूस कोण आहे,बारा चौदा वर्ष खात्या बाहेर राहून काय करत होता हे त्याला पुन्हा सेवेत घेताना यांना कळू नये का?लाज वाटायला पाहिजे त्याला परत सेवेत घेताना .बर घेतलं तर घेतलं वर देशातच नव्हे तर जगात ज्या माणसाचा उद्योगपती म्हणून डंका आहे त्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक स्फोटक असलेली गाडी सापडते अन त्याचा तपास या वाझे सारख्या अतिसामान्य एपीआय कडे दिला जातो .काय होत त्या मागचं खर कारण हे आज दिसून येत आहे .
एवढ्या मोठ्या प्रकरणाचा तपास मोठ्या अधिकाऱ्याकडे द्यावा हे शेम्बड्या पोराला सुद्धा कळेल मग हे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून बसलेल्या राजकारणातील पाच पंचवीस वर्षे घातलेल्या लोकांना कळू नये का ? आपल्या हुकुमावर नाचणारा अधिकारी असला की त्याने लोकांचे मुंडके मोडू दे नाहीतर मनसुख सारख्याचे जीव घेऊ दे यांना काही फरक पडत नाही .शेण खायची सवय लागल्यावर ते कोण आणून देतंय याचा काही संबंध नसतो .


परमवीर सिंग यांनी आजच हे का सांगितले अस विचारलं जात आहे,त्यांचा टायमिंग चुकला का किंवा काही हे मूळ प्रश्न नाही ,मूळ प्रश्न हा आहे की जे काही त्यांनी सांगितले ते खर आहे की खोटं, पण त्यावर कोणी काहीच बोलत नाही .पोलीस दलातील हे कलेक्शन आजच आहे का तर नाही,यापूर्वी सुद्धा बिनबोभाट हे सगळं सुरू होतं आणि पुढेही राहिलं यात शंका नाही .कारण एकदा तोंडाला रक्त लागलं की दुसऱ्या कशाने भूक भागत नाही .हा सगळा प्रकार म्हणजे वेश्येला मनिहार अन पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा असाच म्हणावा लागेल .


ज्या वाझेने एवढं सगळं कांड केलं त्याला वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी यांचा हात डोक्यावर असल्याशिवाय तो हे करू शकत नाही मात्र तरीही काही बोरू बहाद्दर त्याची भलामण करत होते,बर त्याला अटक झाल्यावर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील स्तुतीसुमन उधळायला यांनी कमी केलं नाही .आज ते सगळे तोंडावर पडले आहेत,पण नाक कापलं तरी भोक कायम या पद्धतीने ते अजूनही तोंड वर करून बोलत आहेत .पोलीस दलात असो की शासकीय सेवेत अथवा राजकारणात जो कोणी माणूस आला त्याची त्यावेळची संपत्ती अन आजची संपत्ती याची मोजदाद कोणीच करत नाही,कारण सगळे एकाच माळेचे मनी आहेत .


वाझे, परमवीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरणाने खाकी अन खादी चा काळाकुट्ट चेहरा जगासमोर आणला आहे .हे सगळे लोक एवढे माजल्यासारखे करण्याची हिंमत ठेवतात कारण त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत,जेव्हा लोकप्रतिनिधी निवडायचा असतो तेव्हा आपण चपटी,बोटी,दहा पाच रुपयाकडे बघून मतदान करतो अन आयुष्यभर या लोकांना उरावर नाचण्याची परवानगी देतो,त्यामुळे हे थांबवायचं असेल तर लोकांना पुढाकार घ्यावा लागेल हे निश्चित .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click