पुणे – म्हाडा पेपरफुटी प्रकरणात तपास करताना पुणे पोलिसांना टीईटी परीक्षेत गडबड झाल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे याच्या घरातून पोलिसांनी तब्बल 88 लाखाची रोकड जप्त केली.प्रत्येकी पन्नास हजार ते लाख रुपये एवढा रेट सुपे ने ठरवला होता अशी माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आली. पोलिसांनी सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही अटक केली आहे. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे. रात्री सुपेच्या घराची झडती घेतली तेव्हा 88 लाखांची रोकड सापडली. त्याशिवाय सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
भरती प्रक्रियेची जबाबदारी जी. ए. टेक्नॉलॉजीकडे होती. शिक्षक पात्रता परिषदेत उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शिट रिकामी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. पेपर स्कॅनिंग करून तपासणी करण्याच्या वेळी ओएमआर उत्तरपत्रिका भरली जायची आणि उत्तीर्ण केले जायचे. या दरम्यानही काही परीक्षार्थी नापास झाल्यास त्यांना पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सांगितले जायचे आणि त्यात पास केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, प्रत्येक परीक्षार्थीकडून 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जात होते.
पुणे सायबर पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरवात केल्याने आणि जी ए टेक्नॉलॉजी कडे पोलीस भरती प्रक्रिया देखील असल्याने याचा तपास सुद्धा होण्याची शक्यता आहे.