बीड- बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची तक्रार भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.मुंडे यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत पाटील यांनी या सर्व घोटाळ्याची मंत्रालयीन पातळीवरून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेत ठराविक गुत्तेदारांना दहा वीस कामे वाटून कोट्यवधी रुपयांची खैरात अधिकाऱ्यांनी वाटली आहे.टेंडर क्लार्क ने आपल्याच घरात 40 कोटींची कामे वाटली आहेत.सीईओ पवार व इतरांनी निखिल चव्हाण,जालिंदर डावकर,प्रशांत चव्हाण,शशिकांत कोटुळे ,जगदंबा कन्स्ट्रक्शन, मोहिनीराज कन्स्ट्रक्शन, आरोही सोल्युशन यासह इतर गुत्तेदारांना 300 पेक्षा अधिक कामे वाटप करण्यात आली आहेत.
याबाबत न्यूज अँड व्युज ने बातम्या केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून तक्रार केली.भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांची तक्रार दिली.
यावर मंत्री पाटील यांनी तातडीने या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.मंत्रालयीन पातळीवरून चौकशी होणार असल्याने कोट्यवधी रुपयांची कामे ठराविक गुत्तेदारांना वाटणारे अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यामध्ये खळबळ माजली आहे.।