मुंबई – राज्याचे माजी परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे रिसॉर्ट पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढले आहे.त्यामुळे येत्या आठ दहा दिवसांत हे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार हे नक्की आहे.
अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथील जमीन विकत घेतली, मात्र त्याचं रजिस्ट्रेशन दोन वर्षानंतर केल्याचा आरोप आहे.
ही शेतजमीन असूनही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ती नॉन अग्रीकल्चर करण्यात आल्याचंही म्हटलं जातंय.
हे रिसॉर्ट बांधकाम करताना CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.
पर्यावरण विभागाकडून (Environmental Department) बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांनी अर्ज करण्याचं आवाहन या निविदेद्वारे करण्यात आलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टमधील अनियमिततेचं प्रकरण लावून धरलं होतं. अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून यावर कारवाई होत आहे.