नवी दिल्ली- राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता 27 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली गेली आहे.पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी झाली.यावेळी 27 सप्टेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे.न्या धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होईल.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात आली. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. शिवसेना आमचीच असा दावा शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही हे प्रकरण प्रलंबित आहे.
मात्र घटनापीठानं दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला घेणार आहे. परंतु या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत कुठलाही निर्णय २७ सप्टेंबरपर्यंत घेऊ नये असं कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने केलेली विनंती कोर्टाकडून तूर्तास मान्य करण्यात आली नाही. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना २३ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती
सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण त्यावर कुणाचा अधिकार आहे? भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेना आमदार अपात्र आहेत की नाही? या विविध मुद्द्यांवर सुनावणीसाठी सरन्यायाधीश यू. यू लळीत ५ जणांचं घटनापीठ स्थापन केले. त्यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम.आर शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंहमन यांचा समावेश आहे.