नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने नवीन निवडणूक समिती जाहीर केली असून यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. फडणवीस यांचा समावेश झाल्याने त्यांचा दबदबा दिल्ली दरबारी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपा संसदीय बोर्डात ११ सदस्य असतात तर केंद्रीय निवडणूक समितीत १९ सदस्य असतात. त्यात ११ संसदीय समितीचे सर्व सदस्यांचा समावेश असतो. त्याचसोबत पक्षाचे महासचिव यांनाही आरएसएसचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही समितीत स्थान दिले जाते. बुधवारी घोषित झालेल्या नावांमध्ये १५ नावांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नसला तरी आजच पक्षातर्फे जी निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे, त्यात मात्र देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. जे. पी. नड्डा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अमित शहा, येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के लक्ष्मण, सुधा यादव, भूपेंद्र यादव, ओम माथूर यांचा समावेश करण्यात आला आहे. बी. एल. संतोष हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर अमित शाह यांना भाजपाचं अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये नवीन संसदीय समिती आणि केंद्रीय निवडणूक समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी संसदीय बोर्डातून तीन ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले. त्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश होता. तेव्हा पक्षाने पहिल्यांदाच मार्गदर्शक मंडळ स्थापन केले. त्यात वाजपेयी, आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांचा समावेश केला. मात्र यावेळी या समितीबाबत कुठलीही घोषणा झाली नाही.
यंदा संसदीय समितीत पंजाबचे इकबाल लालपुरा, हरियाणाचे सुधा यादव, तेलंगणाचे के. लक्ष्मण, मध्य प्रदेशचे सत्यनारायण जटिला यांचा समावेश केला आहे. जटिया आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा पंच्याहत्तरी ओलांडलेले नेते आहेत. तरीही त्यांचा समावेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.