मुंबई- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा केला जातोय.याचाच एक भाग म्हणून उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही जिथं असाल तिथं दोन मिनिटं थांबा,राष्ट्रगीत म्हणा अन मग पुढं जा असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहेत. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यसरकारतर्फे करण्यात आलं आहे.
राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.