बीड- शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आ विनायक मेटे यांना तमाम बीड जिल्हा वासीयांना हजारोच्या संख्येने साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.मेटे साहेब अमर रहे,परत या परत या मेटे साहेब परत या अशा घोषणांनी बीडच्या रस्त्यावरून निघालेल्या मेटे यांच्या अंत्ययात्रेत अबाल वृद्ध सहभागी झाले होते.रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत बीड वासीयांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री,आमदार,माजीमंत्री, अधिकारी आणि मेटे यांच्यावर प्रेम करणारे सामान्य नागरिक उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी बीड हुन मुंबईला निघालेल्या मेटे यांच्या गाडीला खोपोली नजीक अपघात झाला.यामध्ये मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव बीड येथिल निवासस्थानी आणण्यात आले.सकाळपासून त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आमदार,खासदार, मंत्री यांची रीघ लागली होती.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शिवसंग्राम भवन येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. लढवय्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय सहभागी आहे. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला.
अमर रहे… अमर रहे.. मेटे साहेब अमर रहे या घोषणांसह अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांची आरास केलेल्या भव्य रथात विनायक मेटे यांचा पार्थिवदेह ठेवला होता. यावेळी कुटुंबातील सदस्य या रथात होते. टाळ-मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक,माळीवेस,सुभाष रोड, शाहूनगर मार्गे अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानाजवळ पोहोचली.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले.त्यानंतर त्यांच्या मुलाने मेटे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले.यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,अतुल सावे,तानाजी सावंत,राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री पंकजा मुंडे,धनंजय मुंडे, खा प्रीतम मुंडे यांच्यासह हजारो नागरिक हजर होते.