बीड- शालेय जीवनापासून जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या अन प्रत्येकवेळी संकटावर मात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या स्व विनायक मेटे यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा आहे.शालेय जीवनापासून शेतात मजुरी,मुंबईत भाजी विक्री,भिंती रंगवणे अशी कामे करत करत मेटे आमदार झाले.त्यामुळेच मराठा समाजाच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांना माहीत होता, त्यासाठीच त्यांनी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.
शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष माजी आ विनायक मेटे यांचे मुंबई नजीक मोठ्या अपघातात दुर्दैवी निधन झाले.या बातमीमुळे बीड जिल्हाच नव्हे तर राज्यावर शोककळा पसरली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या मेटे यांचा शेवट देखील बैठकीसाठी जाताना व्हावा हे मोठं दुर्दैव म्हणावे लागेल.
विनायक मेटे यांचे मूळ गाव केज तालुक्यातील राजेगाव,वडील तुकाराम मेटे यांचे विनायक हे मधले चिरंजीव. शेतमजुरी करून संसार सांभाळणाऱ्या वडिलांना विनायक यांनी शेतात राबून हातभार लावला.शालेय जीवनात कळंब येथे शिकल्यानंतर 1985 च्या काळात मेटे हे मुंबईत दाखल झाले.
मराठा महासंघांच्या कार्यालयासमोर भाजी विक्री करत करत मेटे मराठा महासंघाच्या चळवळीत ओढले गेले.राज्याचे प्रसिध्दी प्रमुख या पदापासून ते महासंघाच्या मोठ्या पदापर्यंत ते पोहोचले.1995 मध्ये सेना भाजप युतीच सरकार आले अन मुंडेंच्या माध्यमातून विनायक मेटे पहिल्यांदा विधानपरिषद सदस्य बनले.त्यानंतर 2022 च्या जून पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून आमदारकी भूषवली.
1996 साली पहिल्यांदा आमदार राहिलेले विनायक मेटे हे सलग पाचवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिले. 1996 ते 2022 सलग 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सदस्य राहिले. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर. आर पाटील यांचे ते अतिशय जवळचे मानले जायचे.