बीड- मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबई ला निघालेल्या माजी आ तथा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1996 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे,पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करणारे माजी आ विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला.मुंबई येथे आयोजित बैठकीसाठी ते रात्री उशिरा आपल्या गाडीतून मुंबईकडे निघाले होते.
पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस वे वर त्यांच्या गाडीचा अपघात झाला.रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मेटे यांच्या निधनाने बीड जिल्हाच नव्हे तर राज्यात शोककळा पसरली आहे.
स्व मेटे यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी बीड येथे आणले जाईल, त्यानंतर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता जालना रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा मागील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या जागेची पाहणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली.