मुंबई- शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे.पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने राऊत यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांची कोठडी वाढवण्यात आली.
या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिळाला आहे.पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं ९ तास संजय राऊतांची चौकशी केल्यानंतर 31 जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोनदा ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आता राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.