मुंबई – राज्याचे माजीमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.ईडीच्या कारवाईच्या भीतीने खोतकर हे शिंदे गटात जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.त्यावर आता पडदा पडला आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आज प्रत्यक्षात खोतकर शिंदे गटात सहभागी झाली आहे.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतांना अर्जुन खोतकर हे देखील दिल्लीत होते. त्यामुळे काही माध्यम आणि सोशल मीडियावर खोतकर हे शिंदे गटात गेल्याची चर्चा होती. दरम्यान याबाबत अर्जुन खोतकर यांनी स्वतः खुलासा करत, आपण शेवटपर्यंत शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचं राहणार असल्याचे सांगितले होते. दिल्लीला आपण आपल्या व्यक्तिगत कामासाठी गेलो असतांना महाराष्ट्र सदनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योगायोगाने समोरा-समोर भेट झाल्याने केवळ नमस्कार केल्याच खोतकर म्हणाले होते. मात्र आज ते शिंदे गटात सामील झाले आहेत.
खोतकर यांच्या जालन्यातील रामनगर येथील कारखान्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. तर याप्रकरणी त्यांची काही संपत्ती सुद्धा जप्त केलेली आहे. तसेच यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. कारखाना खरेदी, विक्री व्यवहारात अनियमित्ता झाल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. तसेच कारखान्यातील यंत्र, जमीन यासह इतर बाबी जप्त केल्या होत्या. त्यामुळे खोतकर यांनी ईडीची भीतीमुळेच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.