मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार उद्या म्हणजे शनिवारी होत आहे.भाजप आणि शिंदेंसेनेच्या एकूण चौदा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
राज्यात राजकिय भूकंप घडवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा दिल्ली दौरा केला.शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये मंत्रीपदावरून सविस्तर चर्चा झाली.
शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या 41 आणि अपक्ष 10 आमदारांमधून तब्बल 5 जण आणि भाजपच्या 8 जनांचा उद्या शपथविधी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.पहिल्या यादीत शिंदे गटासोबत असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होईल तर भाजपकडून जेष्ठ माजी मंत्री शपथ घेतील अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
भाजपकडून गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे,प्रवीण दरेकर,जयकुमार रावल आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिपदाची शपथ घेतील तर शिंदे गटाकडून उदय सामंत,दादा भुसे,बच्चू कडू,अब्दुल सत्तार,गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून तर संजय सिरसाट,शहाजी बापू पाटील हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती आहे.