पुणे – शेतकऱ्यांची एफआरपी ची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना च्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजीमंत्री पंकजा मुंडे आणि माजीमंत्री धनंजय मुंडे या बहीण भावाचे हे दोन कारखाने आहेत हे विशेष.
राज्यात यंदा विक्रमी ऊस उत्पादन झाले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मोठा भाव तर मिळालाच पण एफआरपी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 31 हजार कोटी रुपये जमा झाले.दरम्यान राज्यातील पाच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची तब्बल 120 कोटींची रक्कम थकवली आहे.त्यामुळे या कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ आणि अंबाजोगाई साखर कारखान्याचा समावेश आहे.
सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, ता. पंढरपूर 36 कोटी 74 लाख 90 हजार रुपये, पुणे राजगड सहकारी, निगडे, ता. भोर 25 कोटी 91 लाख 69 हजार रुपये,बीड अंबाजोगाई सहकारी, ता. अंबाजोगाई 8 कोटी 14 लाख 15 हजार रुपये,बीड वैद्यनाथ सहकारी, ता. परळी 46 कोटी 15 लाख 75 हजार रुपये, उस्मानाबाद जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी, खासगी 3 कोटी 40 लाख 69 हजार रुपये रक्कम देणे बाकी आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते. उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे तथा एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्यांना देण्यात आलेले आहेत.
काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे. राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 80 ते 99 टक्के रक्कम देणारे 99 कारखाने आहेत. तर 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी आणि शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलेली आहे.
म्हणजेच अद्यापही 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे. एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत. त्यामध्ये चार सहकारी आणि एका खासगी कारखान्याचा समावेश आहे. त्यांच्याकडे 120 कोटी 37 लाख रुपयांइतकी एफआरपीची रक्कम थकीत आहे.