नवी दिल्ली- राज्यातील सत्तासंघर्षाचा नवा अंक आता 1 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिंदे विरुद्ध शिवसेना या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत आणि शिंदे यांच्या गटाला मान्यता न देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली.
शिवसेनेच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी,कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली.तर शिंदे यांच्यावतीने ऍड हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
तब्बल दीड तास दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले. सदरील सुनावणी ही स्वतंत्र मोठ्या बेंच समोर होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.