मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे.दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पांडे यांनी सकाळी भेट घेतली होती,त्यानंतर सायंकाळी पांडे यांच्यावर अटकेची कारवाई। करण्यात आली आहे.दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.
संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.
तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने 91 कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे यांच्या कंपनीला चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने 4 कोटी 45 लाख रुपये दिले होते. याशिवाय 20 कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं. याचबाबत ईडीकडून तपास सुरु होता.
अखेर याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे. संजय पांडे यांनी दोन दशकांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चं आयटी ऑडिट फर्म सुरु केलं होतं. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता.त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावं लागलं.