मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या काळात संपली.शरद पवार,अजित पवार यांनी शिवसेना संपवली,आपलं वय सत्तर वर्ष असताना आपल्याला आदित्य ला साहेब म्हणावं लागत,हाच आदित्य आमदारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो,52 वर्षात आपण केलेल्या कामाच हेच फळ दिलं का असा सवाल करत शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं हे सांगताना रामदास कदम भावूक झालेले पाहायला मिळाले.
52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचे आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे असेही रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडलं. पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखाद्या पक्षासाठी 52 वर्षे लढणारा नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येते याचा विचार करायला हवा असेही ते म्हणाले.
शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांचीदेखील हकालपट्टी करणार आहात असा प्रश्नदेखील कदम यांनी याावेळी उपस्थित केला. तसेच मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवले. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर आदित्या ठाकरेंनी किती प्रकारची टीका केली, असे म्हणत त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवावे असे रामदास कदम म्हणाले.