बीड- गोदावरी नदीवरील नाथसागर धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने येत्या काही दिवसात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.त्यामुळे गोदाकाठच्या शेतकरी, नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर सुरू आहे.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश नद्या नाल्याना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मोठी धरणे ओसंडून वाहू लागल्याने गोदावरी नदीपात्रात एक लाख क्यूसेक्स पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मराठवाड्यातील नाथसागर धरणात सध्या एक लाख पेक्ष्या अधिक क्यूसेक्स ने पाण्याची आवक सुरू आहे.त्यामुळे आजघडीला नाथसागर धरणात 73 टक्के पाणीसाठा झाला आहे.आणखी दोन तीन दिवसात 80 टक्केपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गोदावरी नदीकाठी बीड जिल्ह्यातील गेवराई,माजलगाव आणि परळी तालुक्यातील जवळपास 85 गावे आहेत.त्यामुळे या गावातील शेतकरी,नागरिक यांनी पुढील तीन चार दिवसात नदीपात्रात असलेल्या विद्युत मोटारी काढून घ्याव्यात,नदीपात्रात जाणे टाळावे तसेच गुरेढोरे नदीकाठी नेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.