मुंबई- शिवसेनेत विद्रोह निर्माण करून मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देणे सुरू ठेवले आहे.शिंदे यांनी सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली तसेच ऑनलाइन बैठकीस तब्बल 14 खासदारांनी हजेरी लावली.यातील 12 खासदार पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत,त्यामुळे खरी सेना कोणाची हे लवकरच स्पष्ट होईल.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत उभी फूट निर्माण झाली आहे. सेनेतील बारा पेक्षा अधिक खासदार हे नाराज असल्याची चर्चा आहे.हे सर्व खासदार पक्षातील घुसमट आणि नाराजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली,ज्यामध्ये शिंदे गटातील नव्या कार्यकारणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख असतील. नव्या कार्यकारणीमुळं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतून ज्यांना दूर केले त्यांनाच नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे. तसेच कामाची जबाबदारी सुद्धा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धती वर नाराज असलेल्या खासदारांमध्ये हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे, धैयशील माने, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांच्यासह चौदा खासदार उद्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.