मुंबई – ज्यांना मंत्री केलं,आमदार केलं,प्रत्येक काम केलं ते सोडून जाऊच कसे शकतात,लांडे मामा तर हातात हात घेऊन रडले अन दुसऱ्या दिवशी गुवाहाटी ला गेले.विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा सवाल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ऍक्शन मोडमध्ये आले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मध्ये ते बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत.
अनेकदा प्रसंग वेगवेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, कधी वेगळं कारण असेल. २-४ लोकांनी फोन करून सांगितलं की, आम्ही लाचार झालोय, आम्ही तुमचेच आहोत. काही गोष्टींचं दुःख आहे. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिथं गेला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. मनाने तरी ते तिथं नसतील. तो माणूस माझ्या कार्यालयात रोज बसायचा, रस्त्याचं, फुटपाथचं, एसआरए, वनविभाग कशाचंही काम असो त्यांचं प्रत्येक काम मी केलं. फोन करून, मेसेज करून सांगायचे मी लगेच काम झालं म्हणून समजा सांगायचो.”
“दिलीप मामा लांडे वर्षावर माझा हात हातात घेऊन रडले आहेत. हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसा शकतो?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. “परवा १०० लोकांना चावी वाटप करायच्या होत्या. मी म्हटलं लांडे मामा दोन दिवस थांबा, आपण काम करून टाकू. मिठी नदीचं कामही केलं,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार संदीपानराव भुमरे यांच्यावरही सडकून टीका केली. तसेच त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करूनही त्यांनी बंडखोरी केल्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “संदीपानराव भुमरे कसे मंत्री झाले तुम्हाला माहिती आहे का? ते पाचवेळ आमदार होते. आजही ते माझं भाषण ऐकत असतील तर त्यांनी सांगावं मी खोटं बोलत आहे.”
“मी जन आशीर्वाद यात्रेत त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. तेव्हा एका शेतकऱ्याने भुमरे पाचवेळा आमदार झालेत मंत्री बनवा, दुसरे म्हटले राज्यमंत्री नाही, कॅबिनेट मंत्रीपद हवं, अशी मागणी केली. मी म्हटलं हो काम झालं, मी उद्धव ठाकरे यांना भुमरे यांना मंत्री करण्यासाठी सांगतो. तुम्ही त्यांना निवडून द्या. एकजण खात्याविषयी बोलू लागला तर मी तो विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असल्याचं सांगितलं,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.