गुवाहाटी – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 40 आमदारांना सुरत वरून आसाम कडे रात्रीतून हलविण्यात आले आहे. गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे.दरम्यान आपण पक्ष सोडलेला नाही अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह या बंडखोर आमदारांनी सूरत येथे प्रयाण केले होते. ले मेरेडियन या हॉटेलमध्ये ते होते. शिवसेनेविरोधात या शिंदे आणि आमदारांनी बंडाचे निशाण उभारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्याआधी, शिंदे यांनी शिवसेनेपुढे काही अटी ठेवल्याचेही बोलले जात होते. शिवसेनेने भाजपासोबत सरकार स्थापन करावे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी काडीमोड घ्यावा अशी मागणी शिंदे आणि आमदारांची आहे, असे म्हटले जाते.
या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकारण टिपेला पोहोचले आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका झाल्या. शिवाय, दादर येथील शिवसेनाभवनात शिवसैनिकांनी गोळा होऊन घोषणाबाजी केली.
शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून त्यातील ३५ आमदार शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असे म्हटले जात आहे. ३५ आमदार जर फुटले तर महाविकास आघाडी सरकारचा बहुमताचा आकडा खाली येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.