मुंबई- राज्याचे नगरविकास मंत्री तथा जेष्ठ शिवसेना नेते एकनाथ शिंदे ,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह तब्बल 17 आमदारांसह नॉट रीचेबल असल्याने महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.प्रताप सरनाईक,तानाजी सावंत हे देखील नॉट रीचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान हे सर्व आमदार सुरत मधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासोबत तानाजी सावंत,भारत गोगावले,शहाजी बापू पाटील,प्रताप सरनाईक ,संजय राठोड,शांताराम मोरे,श्रीनिवास वनगा,प्रकाश आबिटकर, महेंद्र थोरवे ,अब्दुल सत्तार,शंभूराजे देसाई हे देखील गायब आहेत.
आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.