मुंबई – राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला.या निकालाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे.भाजपचे पाचही सदस्य विजयी झाले काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
राज्य विधानपरिषद च्या दहा जागांसाठी निवडणूक घोषित झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले मात्र त्यात अपयश आल्यानंतर सर्वच पक्षानी विजयाचे दावे केले होते.भाजपकडून प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय,उमा खापरे आणि माजीमंत्री राम शिंदे यांना संधी देण्यात आली होती.
काँग्रेसकडून भाई जगताप आणि माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे,राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर तर शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी दिली होती.
सर्वच पक्षांकडील संख्याबळ पाहता पाचवा उमेदवार भाजपचा विजयी होणार की महाविकास आघाडी सहावा उमेदवार विजयी करून भाजपला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
चार वाजता मतदान प्रक्रिया पार पडली अन त्यानंतर काँग्रेस ने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी लांबली होती.सात वाजता मतमोजणी सुरू झाली अन त्यात चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला तर प्रसाद लाड विजयी झाले.