सांगली- महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना सोमवारी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे उघडकीस आली आहे.एक डॉक्टर, दुसरा शिक्षक असलेल्या कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.या घटनेने दिल्लीतील बुऱ्हाडी हत्याकांडाची आठवण झाली आहे.
एक डॉक्टर व दुसरा शिक्षक असलेल्या दोन्ही सख्या भावांनी कुटुंबातील ९ जणांसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सदरील घटना सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडली आहे. प्रथम विष बाधेने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते परंतु ही सामूहिक आत्महत्या असल्याची चर्चा आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर यामागील खरे कारण समोर येईल असे पोलीसांकडून सांगितले जात आहे.
डॉ. माणिक येलप्पा वानमोरे, अक्काताई वानमोरे, रेखा वानमोरे, प्रतिमा वानमोरे, आदित्य वानमोरे, शिक्षक पोपट येलप्पा वानमोरे, अर्चना वानमोरे, संगीता वानमोरे, शुभम वानमोरे सर्व रा. म्हैसाळ अंबिका नगर ( ता. मिरज जि. सांगली ) अशी मयतांची नावं आहेत. मयतांमध्ये दोन सख्खे भाऊ, आई व दोघांच्या पत्नी, मुलं-मुली अशा ९ जणांचा समावेश आहे.
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.