नवी दिल्ली- राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपने आपल्या दोन अधिकृत उमेदवारांना ज्या पद्धतीने जास्तीत जास्त मताचा कोटा दिला अन तिसरा उमेदवार सहज विजयी झाला तशीच खेळी हरियाणामध्ये देखील केली.अजय माकन यांच्या विरोधातील उमेदवाराला भाजपच्या अधिकृत उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मत मिळाली अन माकन पराभूत झाले.
अजय माकन (Ajay Maken) यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झालाय. काँग्रेस पक्षानं निवणुकीपूर्वीच आपला विजय घोषित केला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळं समीकरणं इतकी बिघडली की, अपक्ष कार्तिकेय शर्मा राज्यसभेत पोहोचले.
रिटर्निंग ऑफिसर आरके नंदल यांनी सांगितलं की, भाजप नेते पंवार यांना 36 मतं मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना 23 प्रथम पसंतीची मतं मिळाली आणि 6.6 मतं भाजपकडून हस्तांतरित झाली. त्यांची एकूण मतांची संख्या 29.6 झाली. या लढतीत माकन यांना 29 मतं मिळाली. मात्र, दुसऱ्या पसंतीचं मत न मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला.
राज्यसभा निवडणुकीत एक मत 100 इतकं मानलं जातं. हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं, तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. शिवाय, काँग्रेसचं एक मत निवडणूक आयोगानं रद्द केलं. त्यामुळं 88 मतं शिल्लक होती, म्हणजे 8800 मतं. दरम्यान, विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पंवार यांच्या विजयानंतर 66 मतं शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडं हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मतं मिळाली. दोघंही समान होते, पण भाजपला 66 मतं मिळाल्यानं कार्तिकेयची मतं 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसला क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध ठरल्यानं हा सारा खेळ अंगलट आलाय.