मुंबई – येत्या 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. घोडेबाजार होणार नाही अन आमचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे.यात महाराष्ट्रातून सहा जागेवर निवडणूक होणार आहे.यामध्ये संख्याबळाच्या आधारावर भाजप तीन,शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा एक एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीकडे जवळपास170 च्या आसपास तर भाजपकडे 113 एवढे संख्याबळ आहे.मात्र शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार या दोघांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची नावे जाहीर केली अन रात्री उशिरा कोल्हापूर चे धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले.
आता सहा जागेसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने घोडेबाजार होणार,आमदारांची पळवापळवी होणार हे निश्चित आहे.भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमचे तीन खासदार निवृत्त झाले होते आता तीन नवे खासदार निवडून येतील.घोडेबाजार टाळायचा असेल तर त्यांनी आपला एक उमेदवार माघारी घ्यावा असेही फडणवीस म्हणाले.