मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मलिक यांच्या वकिलाने ही माहिती न्यायालयात दिली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ताप आणि अतिसाराच्या तक्रारींवरून सरकारी जेजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरअसल्याचे समजत आहे.
त्यांच्या वकिलाने मुंबईतील विशेष न्यायालयात ही माहिती दिली. रुग्णालयाने सांगितले की मंत्री अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात बंद असलेले ६२ वर्षीय नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता.
तथापि, अंमलबजावणी संचालनालयाने अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिक “कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा” प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा नवाब मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितले की, राष्ट्रवादीच्या नेत्याचे कुटुंबीय त्यांना घरी बनवलेले जेवण देण्यासाठी गेले असता त्यांना सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मोर यांनी न्यायालयाला सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेले नवाब मलिक हे गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली असून ते ‘गंभीर’ आहेत.
सर जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे यांनी सांगितले की, मलिक यांना सकाळी १० वाजता रुग्णालयात आणण्यात आले.सुरसे म्हणाले, “पोट बिघडल्याची तक्रार केली असून त्यांचा रक्तदाब स्थिर नाही. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.”