मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयाने या महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रेणू शर्मा ही महिला करुणा शर्माची बहीण आहे हे विशेष.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोबाईल वर मेसेज पाठवून ब्लॅकमेल केलं जातं असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती.ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की,रेणू शर्मा ही महिला आपल्याला म्हणते आहे कीमागील वर्षी सहजच एक कागद पोलिसांत दिला तर तुमचं मंत्री पद धोक्यात आलं होतं, आता पुन्हा तिच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचं मंत्रीपद घालवीन, असं होऊ द्यायचं नसेल तर मला 5 कोटी रक्कम आणि 5 कोटींचे दुकान घेऊन द्या’, असं ब्लॅकमेल करत अशा प्रकारची खंडणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कथित रेणू शर्मा नामक महिलेनं केली आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेल करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली आहे.
कथित रेणू शर्मा या महिलेनं मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिनं सदर तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्सअॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांत दिले असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदौर कोर्टात हजर केलं, इंदोर कोर्टानं तिचा ताबा दिला आणि त्यानंतर आज सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दरम्यान, सदर रेणू शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातील तक्रारी यापूर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.